
नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱया आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन आणि प्रशासनावर ताबा मिळविण्यासाठी महायुतीत चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपल्या गटाचा स्वतंत्र आखाडा निर्माण केला आहे. कुंभमेळा नियोजनासह जिह्यातील विकासकामांचा आढावा घेणारी बैठक त्यांनी आज शुक्रवारी घेतली. भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या पक्षाचे अन्य आमदार व अजित पवार गटाच्या मंत्र्यांसह आमदारांनी याकडे पाठ फिरविली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपलीच सरशी व्हावी यासाठी महायुतीत शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. प्रशासनावर ताबा ठेवण्यासाठी चढाओढ आहे. सन 2026-27 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. शिंदे, अजित पवार गटाने आक्षेप घेतल्याने भाजपाच्या गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. असे असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतून जिल्हा नियोजनाची ऑनलाईन बैठक घेतली. पालकमंत्री पदावरील दावा कायम असल्याचे दाखविण्यासाठी मंत्री गिरीश महाजन या बैठकीला हजर होते. जिह्यातील भाजपा आमदारांनी गैरहजेरी लावून अजित पवारांची ढवळाढवळ नाकारली. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत घेतलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे नाशिकचे मंत्री दादा भुसे यांनी दांडी मारली होती.
नाशिकमध्ये महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह अन्य खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर भाजपाचाच प्रभाव अधिक आहे. साहजिकच भाजपाची प्रशासनावर पकड आहे. प्रशासकीय यंत्रणेवर आपला वचक राहावा, यासाठी शिंदे गटाचा आटापिटा सुरू आहे. नाशिक दौऱयावर आलेले एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, शहर, जिह्यातील विकासकामांचा आढावा, तसेच सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाची माहिती घेतली. अधिकाऱयांना विविध सूचना दिल्या. मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि या गटाचेच पदाधिकारी यावेळी हजर होते. महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, त्यांच्या गटाचे आमदार; भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या व्यतिरिक्त स्वतःला कुंभमेळा मंत्री म्हणवून घेणारे भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, भाजपाच्या जिह्यातील अन्य सर्व आमदारांनी या बैठकीला दांडी मारली.
आभार सभेचा फ्लॉप शो
नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आभार दौऱयानिमित्त जाहीर सभा झाली. या सभेला गर्दी जमवण्यासाठी माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आर्थिक रसद पुरवून टार्गेट देण्यात आले होते. सर्व शक्ती पणाला लावूनही शिंदे यांच्या भाषणावेळी हे मैदान अर्ध्याहून अधिक रिकामेच होते.
आमदार फरांदे यांची हेरगिरी
जिह्यात भाजपाचे पाच आमदार असताना बैठकीस केवळ देवयानी फरांदे उपस्थित राहिल्या. एकनाथ शिंदे काय बोलतात यासह येथील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठीच त्यांना पाठवण्यात आले असावे, अशी चर्चा होती.