उद्यान बंद करून वाचनालय उभारण्याचा मिंधे गटाचा घाट, डोंबिवलीत शिवसेनेचे आंदोलन

डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर येथील कवयित्री बहिणाबाई उद्यानामध्ये वाचनालय उभारण्याच्या प्रयत्नांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शवला आहे. या उद्यानापासून काही अंतरावर महापालिकेचे वाचनालय आहे. असे असतानाही व्यक्तिगत स्वार्थासाठी मिंधे गटाने उद्यान बंद करून वाचनालय उभारण्याचा घाट घातल्याचा आरोप करत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलन केले.

सुनील नगर परिसरातील बहिणाबाई उद्यान हे स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे शेकडो लहान मुले दररोज खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी आणि स्थानिक रहिवासी व्यायामासाठी येतात. मात्र हे उद्यान छोटे करून तिथे वाचनालय उभारण्याचा घाट मिंधे गटाचे काही लोक केवळ राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप करत शिवसेनेचे शहरप्रमुख अभिजित सावंत यांनी शेकडो शिवसैनिकांसह तीव्र विरोध दर्शवला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, विभागप्रमुख विनायक गोवळकर, शाखाप्रमुख अभय दिघे, उपशहर संघटक प्रणव सावंत, स्मिता पाटील, वंदना बेलेकर, मंदार गुरव, ऋषभ चिखल, रजत पाटील आदी उपस्थित होते.

पालिकेने दखल घ्यावी
शिवसेनेने वाचनालयाचे काम बंद पाडल्यानंतर पालिकेला निवेदन दिले. महापालिकेने या प्रकरणाची त्वरित दखल घ्यावी आणि बहिणाबाई उद्यानात वाचनालय उभारण्याचा निर्णय स्थगित करावा असे निवेदन आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना देण्यात आले.