रिफायनरीच्या मुद्द्यावरून भाजप-मिंधे गटात ठिणगी पडणार, रिफायनरी विषय संपला म्हणणारे आता काय करणार

पेट्रोकेमिकल रिफायनरी बारसूलाच होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर बारसूमध्ये वातावरण तापले आहे. महायुतीच्याच उमेदवाराने निवडणुकीत बारसू हा विषय संपलेला आहे, अशी घोषणा केली होती आणि आता त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी बारसूमध्येच रिफायनरी होणार अशी घोषणा केल्यामुळे मिंधे गट आणि भाजपमध्ये ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी रेटण्याचा प्रयत्न केला तर मिंधे गटाचे आमदार प्रकल्पविरोधकांसोबत राहणार की मुख्यमंत्र्यांसोबत राहणार, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

नाणार येथील रिफायनरी रद्द झाल्यानंतर ती रिफायनरी बारसू येथे करण्याचा प्रयत्न केला. बारसूतील माती परीक्षणावेळी स्थानिकांनी प्रचंड आंदोलन छेडले होते. लाठ्याकाठ्या खाल्ल्या होत्या, पण प्रकल्प होऊ न देण्याचा निर्धार केला होता. माती परीक्षणाच्या अहवालाचे पुढे काय झाले हे सर्व गुलदस्त्यात राहिले.

उद्योगमंत्री उदय सामंत रिफायनरी प्रकल्प रेटण्यासाठी सुरुवातीला प्रयत्नशील होते. विधानसभा निवडणूक जाहीर होताच राजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पाचा विषय संपला असे जाहीर करताना बारसूत रिफायनरी प्रकल्प होणार नाही असे जाहीर केले होते. त्यांच्या वैयक्तिक जाहीरनाम्यातही बारसूत प्रकल्प होणार नाही असा उल्लेख केला होता. त्यावेळी प्रकल्प विरोधकांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर ते निवडूनही आले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिफायनरी बारसूलाच होणार अशी भूमिका जाहीर केली. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आता मिंधे गट काय भूमिका घेतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्र्यांनीच काय, पंतप्रधान किंवा सौदीच्या राजाने जरी सांगितले, रिफायनरी प्रकल्प बारसूत होणार, तरीही आम्ही होऊ देणार नाही. ज्या राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात रिफायनरी प्रकल्प होणार नाही असे आश्वासन दिले होते त्यांनी ते पाळावे. तसेच आपल्या मित्रपक्षाला त्याची जाणीव करून द्यावी. – सत्यजित चव्हाण, रिफायनरी प्रकल्प विरोधक.

प्रकल्प होऊ देणार नाही, आम्ही स्थानिकांसोबत, विनायक राऊत यांचा इशारा

रिफायनरी बारसूलाच होणार या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर शिवसेना  नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी बारसूमध्ये कदापिही रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नसल्याचे जाहीर केले. शिवसेना रिफायनरी प्रकल्पविरोधकांसोबतच राहील. प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा आंदोलन उभे करू, असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला.