शिंदे, फडणवीस,अजित पवार यांनी महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीच्या वेशीवर टांगली; सुषमा अंधारे यांचा महायुतीवर घणाघात

महायुती सरकारच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. बालिकांवर अमानुषपणे अत्याचार होत आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यास राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. गेल्या दहा वर्षांतील साडेसात वर्षे राज्याच्या गृहमंत्रीपदी फडणवीस आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम गृहमंत्री म्हणून फडणवीसांची नोंद करावी लागेल, असा घणाघात शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पारनेर येथे केला.

आमचा लाडकी बहिण योजनेला विरोध नाही. मात्र तुम्ही करीत असलेल्या जाहिरातबाजीला आमचा विरोध आहे.आमच्याच कष्टाच्या पैशातून आम्हाला दीड हजार रुपये देता आणि भीक दिल्यासारखी जाहिरातबाजी करता ,हे खपवून घेतले जाणार नाही, असे अंधारे यांनी ठणकावून सांगितले. राज्यातील महिला महायुतीच्या दीड हजार रुपयांना भुलणार नाहीत,आपली मतं विकणार नाहीत असेही अंधारे म्हणाल्या.

पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यात अंधारे बोलत होत्या.पक्षाच्या प्रवक्त्या सुवर्णा वाळुंज, जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले, तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे, डॉ.भास्कर शिरोळे,किसन सुपेकर, डॉ.पद्मजा पठारे,प्रियांका खिलारी,अनिल शेटे,राजू शेख,गुलाबराव नवले, बाबासाहेब रेपाळे आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या उपनेत्या अंधारे म्हणाल्या की,राज्यात एकीकडे महिला सुरक्षित नाहीत.दुसरीकडे तरूणांच्या हाताला काम नाही.राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. कांद्याला, दुधाला व इतर शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.महायुती सरकार अपयशी ठरले आहे.राज्यातील जनतेचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी महायुती सरकारचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार दिल्ली दरबारी लोटांगण घालण्यात धन्यता मानत आहेत.या तिघांसह राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीच्या वेशीवर टांगली असल्याची टीका अंधारे यांनी केली.

चार दिवसांपूर्वी बदलापूर येथील दोन लहान बहिणींवर शाळेतील सफाई कामगाराने अत्याचार केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.या घटनेमुळे संतप्त झालेली बदलापूर येथील जनता रस्त्यावर उतरली आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला गृहमंत्री फडणवीसांना वेळ नाही.प्रश्न विचारणारांना, न्याय्य मागण्या करणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा फडणवीस करतात.आंतलवली येथील मराठा आंदोलकांवर, आळंदी येथे वारकऱ्यांवर तसेच कोकणातील रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर फडणवीसांच्या पोलिसांनी निघृणपणे लाठीहल्ला केला,त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असे अंधारे म्हणाल्या.

सर्वसामान्य जनतेवर अत्याचार करणाऱ्या महायुतीच्या सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून देण्याचा निर्णय राज्यातील जनतेने घेतला आहे. जनतेच्या मनात महायुती सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. याची झलक नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसली असल्याचे अंधारे म्हणाल्या. शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार नीलेश लंके‌ यांनी पारनेर -नगर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला सोडण्याचा शब्द दिला होता,त्यांनी आता शब्द पाळावा असे आवाहन डॉ.पठारे यांनी केला.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा.पारनेर मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊ असे आश्वासन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नगर येथील बैठकीत दिले होते.असा दावा डॉ.पठारे यांनी केला.

कोरोना संसर्गात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्रात तब्बल 1 लाखांपेक्षा जास्त मृत्यू टळले हे भाजपप्रणीत केंद्र सरकारने मान्य केले आहे. पारनेरमध्येही खासदार नीलेश लंके यांच्या बरोबरीने डॉ.श्रीकांत पठारे यांनी करोना रुग्णांची सेवा केली आहे.पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेण्यात यावा अशी जाहीर विनंती आपण शिवसेनेच्या नेत्या, प्रवक्त्या या नात्याने आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करीत आहोत असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.सुषमा अंधारे यांच्या आगमनापूर्वी,ढोल ताशा व झांज पथकाच्या गजरात पारनेर शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती.अंधारे यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे बसस्थानक चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले.तेथून मिरवणुकीने त्यांना सभास्थळी नेण्यात आले.