विकासाच्या नावाखाली महालक्ष्मी रेसकोर्सची मोक्याची जागा बळकावण्यासाठी ‘घटनाबाह्य’ मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर मित्राकडून संबंधित व्यवस्थापनाला धमकावण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. या दबावाला व्यवस्थापनाने बळी न पडता ठामपणे विरोधात उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यातील मिंधे-बीजेपी सरकारकडून महालक्ष्मी रेसकोर्स, वरळीतील मोक्याच्या जागा विकासाच्या नावाखाली बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव सुरू आहे. जागा बळकावल्यानंतर या ठिकाणी हॉटेल, मोठमोठय़ा इमारती आणि व्यावसायिक सेंटर तयार करण्याचा डाव असल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. रेसकोर्सच्या जागेचा ताबा सोडण्यासाठी संबंधित व्यवस्थापनावर करार करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बिल्डर मित्र आणि कंत्राटदार कठपुतळीसारखे आपल्या तालावर नाचवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
ही लूट थांबवावीच लागेल
बिल्डरच्या फायद्यासाठी त्यांनी अलीकडेच महालक्ष्मीचे रेसकोर्स मुलुंड येथे हलवण्याचा डाव आखला होता आणि आता स्वतः बिल्डरच रेसकोर्सची जागा बळकावण्यासाठी सरसावला आहे. त्यामुळे हे सरकार सर्वसामान्यांचे नसून केवळ घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र आणि कॉट्रक्टटरसाठी काम करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या मुंबईकरांच्या हक्काची 226 एकर मोकळी जागा एक बिल्डर दुसऱ्या बिल्डरला विकणार आहे. त्यामुळे आपल्या मुंबईची होणारी लूट थांबवण्यासाठी सगळ्यांनी विरोधात उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या हक्काची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक इंचही जागा बळकावू देणार नाही. यासाठी मिंधे सरकारविरोधात लढा उभारू!
– आदित्य ठाकरे, शिवसेना नेते