
केंद्रीय अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राची पुरती निराशा केली. महाराष्ट्राच्या वाटय़ाला अपेक्षित असे काहीच मिळाले नाही. बिहार आणि आंध्र प्रदेशच्या कुबडय़ांवर टिकून राहण्यासाठी मोदी सरकारने त्या दोन्ही राज्यांना भरभरून दिले. देशाला सर्वाधिक आर्थिक पाठबळ देणाऱ्या महाराष्ट्राची झोळी मात्र रिकामीच ठेवली. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर दिसून आला. अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्यासाठी त्यांची अक्षरशः तारांबळ उडाली.
मोदी सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्राची उपेक्षा केली. तरीसुद्धा प्रसारमाध्यमांना सामोरे जाण्यासाठी भाजपचे तथाकथित प्रवक्ते अर्थसंकल्पाची प्रतच समोर घेऊन बसले होते. कुठे महाराष्ट्र दिसतोय का हे शोधत होते. पण मोदी सरकारने महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हे त्या बोलघेवडय़ांना सापडलेच नाही. त्यामुळे नेहमी टीव्ही वाहिन्यांवर अकलेचे तारे तोडणाऱ्या भाजप नेते आणि भाजपवासीय प्रवक्त्यांची आज गोची झाली. महाराष्ट्रासाठी काय दिले या माध्यमांच्या प्रश्नावर भाजप नेते निरुत्तर झाल्याचे दिसले. कारण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या जाहीरनाम्यातीलच इंटर्नशिपसारख्या अनेक गोष्टींचे अनुकरण अर्थसंकल्पात केले आहे.