विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली!

भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचार, मनमानी कारभार, दहशत आणि एकाधिकारशाहीचा कारभार सुरू आहे. करदात्या नागरिकांच्या खिशातील पैसा ओरबाडला जात असून, नागरिक पाणी, वीज, रस्ते, खड्डे या प्रश्नांनी वैतागलेले आहेत. या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीने ‘परिवर्तन’ करायचे ठरविले आहे. हे परिवर्तन करण्यासाठी महाविकास आघाडीची शक्ती एकदिलाने लढणार असून, त्यासाठी आमच्यामध्ये एकजूट आहे. आमची एकजूट पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार यांनी केली.

शिवसेनेचे राज्य संघटक पवार यांच्या निवासस्थानी भोसरी विधानसभा महाविकास आघाडीची बैठक झाली. यावेळी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक रवि लांडगे, माजी नगरसेवक व भोसरी विधानसभाप्रमुख धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.

एकनाथ पवार म्हणाले, ‘विरोधकांकडून जाणीवपूर्वक काही गोष्टींना खतपाणी दिले जात आहे. उगाचच काही वावड्या उठविल्या जात आहेत. मात्र, महाविकास आघाडीमध्ये फूट पाडणे आता विरोधकांना शक्य नाही. महाविकास आघाडी एकदिलाने, एकजुटीने सर्वत्र कामकरणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघही त्याला अपवाद राहणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जो उमेदवार भोसरी विधानसभेसाठी ठरविण्यात येईल, त्या उमेदवाराचे काम आम्ही एकजुटीने करणार आहोत.’

‘भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. शिवसेनेला मानणारा वर्ग हा कधीच पक्षाशी, पक्षाच्या तत्त्वांशी गद्दारी करीत नाही. हा या मतदारसंघाचा इतिहास आहे. शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता-पदाधिकारी या मतदारसंघात महाविकास आघाडीचेच काम करेल,’ असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.