![eknath-khadse](https://www.saamana.com/wp-content/uploads/2023/07/eknath-khadse-696x447.jpg)
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे त्यांनी सांगितले खरे मात्र अद्याप त्यांची घरवापसी झालेली नाही. एकनाथ खडसे यांचा औपचारिकरित्या भाजप प्रवेश झालेला नसताना आता एक्झिट पोलचे आकडे पाहून त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
राज्यात 40 हून अधिक जागा जिंकायचा दावा करणाऱ्या भाजपला एक्झिटपोलमध्ये 19 ते 20 जागा मिळतील असा अंदाज लावण्यात आला आहे. फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपला किमान 20 जागांचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. त्याबाबत एकनाथ खडसे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसणार असल्याचे मान्य केले आहे.
”महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण झालंय, त्याचा फटका भाजपाला बसताना दिसतोय. राज्यतील जनतेला हे फोडाफोडीचं राजकारण मान्य नसल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला. मूळ पक्ष ज्यांचा आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले. त्यामुळे आता जो फटका बसतोय तो या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे”, असे खडसे म्हणाले.