
नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा झाला तर महायुतीत एकही मंत्री राहणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे म्हणाले आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असून यावर आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे म्हणाले की, ”धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला आहे. गेले तीन महिने सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. यातच आज त्यांनी राजीनामा दिला आहे. मला वाटतं त्यांनी याआधीच राजीनामा दिला पाहिजे होता. संतोष देशमुख यांच्या हत्याचे निर्घृण फोटो समोर आले आहेत. अशा निर्घृण हत्या करणाऱ्यांना कोणाची साथ असेल, तसे निष्पन्न होत असेल, तर हे दुर्दैवी आहे. याप्रकरणी आणखी सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.”
एकनाथ खडसे पुढे म्हणाले, ”नैतिकता दाखवताना राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्या बाबतीत घडलं होतं. वास्तविक पाहता माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. मी ती जमीन घेतली नव्हती. मी फक्त एक साधी मीटिंग घेतली आणि ती मिटिंग घेतली म्हणून मला नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा लागला. असाच जर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर, या मंत्रिमंडळात एकही सदस्य राहू शकणार नाही. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायचा तर, यांना प्रत्येकालाच राजीनामा द्यावा लागेल. नैतिकता आता यांच्याकडे (महायुती सरकारमधील मंत्र्यांकडे) शिल्लकच राहिली नाही, म्हणून इतके दिवस आपल्याला वाट पाहावी लागली.”