>>अस्मिता प्रदीप येंडे
सावळा विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ, साऱ्या जगताची माऊली म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. याच पांडुरंगाच्या पंढरीची वारी करण्याची परंपरा अविरत सुरू आहे. आषाढी एकादशीला विविध भागांतून वारकरी पायी वारी करतात. या वारीत वारकरी आपल्या मानसिक, शारीरिक व्यथा, वेदना विसरून अखंड हरिनामाचा जप करत वारी करतात. पंढरीची वारी केल्याने काय साध्य होते? वारी का करायला हवी? वारीचे नेमके प्रयोजन काय? या प्रश्नांची उत्तरे एका सहजसुंदर कादंबरीमध्ये सापडतात. लेखक सुनील पांडे यांनी ‘एक तरी वारी अनुभवावी’ या कादंबरीच्या माध्यमातून वारीचे विलक्षण अनुभव शब्दबद्ध केले आहेत. ‘विठूराया आणि वारी’ हे समीकरण इतके व्यापक आहे की, जितके लिहू तितके शब्द कमी पडतील, पण लेखकाने अगदी नेमक्या आकृतिबंधात वारीचे महत्त्व आणि प्राप्त होणारी दिव्य अनुभूती अत्यंत आध्यात्मिक तसेच व्यावहारिक दृष्टीने मांडली आहे. परमार्थ आणि ईश्वर भक्ती दोन्हीही समांतर पद्धतीने सांभाळता येतात याचे दर्शन लेखकाने घडवले आहे. माधव हा या कादंबरीचा नायक. कादंबरीची सुरुवातच होते ती माधव पंढरपुरात पोहोचल्याची खूण घेऊन. हा वारी करणारा कादंबरीचा नायक खरे तर नास्तिक. मग तरीही असे अचानक काय होते की, परमेश्वराशी फारकत घेतलेला माधव वारी करायला तयार होतो? याच कोडय़ाचे उत्तर म्हणजे ही कादंबरी होय. आध्यात्मिक कुटुंबात जन्मलेला नास्तिक माधव जेव्हा पहिल्यांदा वारी करतो तेव्हा त्याला या वारीत विविध विचारांची, स्वभावाची माणसे भेटतात, ज्यामुळे परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक होते. वारीत त्याला सर्वधर्मसमभावाची खरी व्याख्या कळते. भजन-कीर्तन करत, हरिनामाचा जयघोष करत माणुसकीची सौंदर्यस्थळे दर्शविणारी ही वारी माणसाला कशी समृद्ध करते, हे वाचताना वाचकांनाही शब्दवारी घडते. वर्तमानातून काही काळ भूतकाळात रममाण होऊन पुन्हा वास्तवात आणणारे प्रसंग अत्यंत जिवंत चित्र होऊन डोळ्यांसमोर तरळत राहतात आणि त्यात सोन्याहून पिवळं म्हणजे पुस्तकाच्या प्रत्येक डाव्या पानावर चित्राच्या माध्यमातून भेटणारा पांडुरंग! वारी माणसाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपले पाय घट्ट रोवून उभे राहण्याची प्रेरणा देते.
ज्या अनपेक्षित घटनांमुळे माधवच्या जीवनात नास्तिकतेचे कुंपण तयार होते, त्या कुंपणाला भेदून आस्तिकतेचे वलय कसे निर्माण होते ही अलौकिक प्रचीती देणारी ही कादंबरी वाचनीय झाली आहे.
एक तरी वारी अनुभवावी
n लेखक ः सुनील पांडे n प्रकाशक ः सुनील पांडे n मूल्य ः 180 रू.