
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. मंगळवारी (22 एप्रिल) रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये 25 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली. या हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने कठोर निर्णय घेतले.
केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द करत पाकिस्तानचे नाक दाबले. हिंदुस्थानच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची चांगलीच टरकली आहे. अशातच माजी परराष्ट्र आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावर भुट्टो झरदारी यांनी हिंदुस्थानला पोकळ धमक्या देण्यास सुरुवात केली आहे.
हिंदुस्थानने सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. अशातच एका जाहीर सभेला संबोधित करताना बिलावल भुट्टो यांनी हिंदुस्थानला धमकी दिली. मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून हिंदुस्थानला सांगायचे आहे की, सिंधू नदी आमचीच होती आणि आमचीच राहील. सिंधू खोऱ्यात एकतर आमचे पाणी वाहेल किंवा त्यांचे रक्त, असे चिथावणीखोर भाष्य बिलावल भुट्टो यांनी केले.
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली 30 वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची कबुली
हिंदुस्थानची लोकसंख्या जास्त असल्याने ते पाणी कुणाचे हे ठरवू शकत नाहीत. पाकिस्तानचे लोक धाडसी आणि अभिमानी आहेत. आम्ही सीमेवर आणि आतही शौर्याने लढू. सीमेवरील आमचे सैन्य प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे, अशी धमकी भुट्टो यांनी दिली.
सिंधू पाणी करार काय आहे?
सिंधू नदीच्या खोऱ्यातील 6 नद्यांच्या पाणी वाटपावर देखरेख करणारा हा महत्त्वाचा करार आहे. याला सिंधू जल करार असे म्हणतात. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये दोन युद्ध झाल्यानंतरदेखील 1960 चा सिंधू जल करार किंवा इंडस वॉटर्स ट्रिटी (आयडब्ल्यूटी) टिकून राहिला. मात्र आता पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
बलुचिस्तानमध्ये BLA चा मोठा हल्ला; आयईडी स्फोटाने पाकिस्तानी सैन्याचा ताफा उडवला, 10 सैनिक ठार