![navi mumbai munciple corporation](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/navi-mumbai-munciple-corporation--696x447.jpg)
समान काम समान वेतन हे धोरण लागू करण्यास नवी मुंबई महापालिकेने टाळाटाळ केल्यामुळे विविध विभागात काम करणारे ८ हजार ५० कंत्राटी कामगार येत्या सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. समान काम समान वेतन नाही तर आता माघार नाही, असा इशारा कामगारांनी दिला आहे. या संपामुळे नवी मुंबईकरांची कचराकोंडी होणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा, पाणीपुरवठा, उद्यान आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी समान काम समान वेतन हे धोरण लागू करण्याचा निर्णय २००७ मध्ये घेण्यात आला होता. मात्र प्रशासनाने चालढकल केल्यामुळे हे वेतन धोरण लागू झाले नाही.
२०२४ मध्ये नगररचना विभागाने पालिका प्रशासनाला समान काम समान वेतन धोरणाबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एक समिती स्थापन केली.
या समितीचा अहवाल हा कामगारांच्या विरोधात गेला आहे. कंत्राटी कामगारांना सध्या २६ हजार ९०७ रुपये मासिक वेतन मिळते. जर समान काम समान वेतन धोरण स्वीकारले तर हे वेतन ४ हजार ४०७रुपयांनी कमी होईल आणि कामगारांचा पगार थेट २२ हजार ५०० रुपयांवर येईल, असा अभिप्राय समितीने दिला आहे.
ही शुद्ध फसवणूक आहे, असा आरोप समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी आज पत्रकार परिषदेत करून सफाई कामगार सोमवारपासून बेमुदत संपावर जाणार असे जाहीर केले. याप्रसंगी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे महासचिव मिलिंद रानडे, गजानन भोईर, महेंद्र पाटील, गणेश पाटील, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
राजेश नार्वेकर, अभिजित बांगर पाठीशी उभे राहिले
समान काम समान वेतन हा प्रस्ताव यापूर्वीही शासनाकडे पाठवण्यात आला होता. तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी हा प्रस्ताव लागू केला तर तिजोरीवर २२ कोटी रुपयांचा भार पडेल असे शासनाला कळवले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हे धोरण लागू केल्यानंतर २७ कोटी ३४ लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च होणार असल्याचे स्पष्ट करून शासनाकडे अनुदानाची मागणी केली होती. मात्र आता विद्यमान आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या समितीने थेट कामगारांचा पगार कमी करण्याचा निष्कर्ष काढला असून हा अहवाल जाणूनबुजून तयार करण्यात आला आहे. राजेश नार्वेकर आणि अभिजित बांगर हे कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले तसे चित्र आता दिसत नाही, अशी खंत महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे महासचिव मिलिंद रानडे यांनी यावेळी व्यक्त केली