छत्तीसगडमध्ये चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद; 2 जखमी

छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. नारायणपूर-अबुझमाड भागात झालेल्या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या मोहिमेदरम्यान एक जवान शहीद झाला असून दोन जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारांसाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडा भागात डीआरजी, एसटीएफ आणि आयटीबीटीची 53 वी बटालियन संयुक्तपणे मोहीम राबवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या भागात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अजूनही कुतुल, फरसबेडा आणि कोडतामेटा भागात चकमक सुरू आहे. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनीही यास दुजोरा दिला आहे.

दरम्यान, छत्तीसगड पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सातत्याने संयुक्तपणे मोहीम राबवत आहेत. या मोहिमांना यशही मिळत असून यंदाच्या वर्षी आतापर्यंत 120 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे. सर्वाधिक नक्षलवादी बिजापूर जिल्ह्यात मारण्यात आले आहेत.