तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२४ पूर्वीची सुमारे साडेआठ हजार कामे अद्याप अपूर्ण आहेत. यात वैयक्तिक सिंचन विहिरी, गाय गोठा, घरकुलांच्या कामांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर ही कामे अपूर्ण असल्याने अकुशल मजुरीचे ६०:४० प्रमाण राखता येणे शक्य नाही. त्यामुळे नवीन सार्वजनिक कामांना वर्क कोड देऊ नये. तसेच वर्क कोड दिलेली परंतु एकही मस्टर न निघालेली कामे सुरू न करण्याच्या स्पष्ट सूचना मग्रारोहयो आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यांच्या पत्रामुळे तालुक्यातील पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक, सार्वजनिक विहिरी, रस्ते आदी कामांना ब्रेक बसल्याने कार्यारंभ आदेश घेऊन फिरणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील गाव पातळीवरील ठेकेदारांनी मग्रारोहयोत मोठ्या प्रमाणात कुशलची कामे मंजूर करून घेतली. विशेष म्हणजे या कामांचे आदेश थेट मंत्रालयस्तरातून निघत असल्याने ठेकेदारांनी मंत्रालय गाठले होते. यात ९० टक्के कुशल आणि १० टक्के अकुशल निधी खर्चाचे प्रमाण होते. त्यामुळे मंजूर झालेली काही कामे संबंधितांनी झटपट उरकविण्यावर भर दिला होता. मात्र, दोन-दोन वर्षे होऊनही या कामांची देयके न मिळाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत. यात सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉकच्या कामांची संख्या अधिक होती. एकीकडे कामे मंजुरी केली जात असताना ती पूर्णत्वास मात्र नेण्यावर कोणीच लक्ष दिले नाही. वैजापूर तालुक्यात मग्रारोहयोत मोठी कामे केली आहेत. केंद्र सरकारने वर्क ऑर्डर झालेली मात्र मस्टर न निघालेली कामे बंद करण्याचे कळविले आहे. तालुक्यात जवळपास २५ हजार कामे मंजूर झालेली आहेत. त्यामुळे ही कामे बंद न करता लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील अपूर्ण असलेल्या कामांची संख्या
वैजापूर तालुक्यात कृषी विभागाची ४७३, सामाजिक वनीकरण ८५, रेशीम लागवड १५३, जिल्हा परिषद सिंचन विभाग ३ व वन विभागाची ५ अशी ७१९ कामे अपूर्ण आहेत. तर पंचायत समितीतर्गत गबियन बंधारे ७५, गाय-गोठा १ हजार ६८०, घरकुल ९४४, नाला सरळीकरण ५, पेव्हर ब्लॉक ७४, फळबाग ५१, बांध बंदिस्ती २, बिहार पॅटर्न वृक्षलागवड १०, मातोश्री पाणंद रस्ता १९५, सिमेंट रस्ता ९, महोगनी वृक्षलागवड ३१९, विहीर पुनर्भरण २१, सिंचन विहीर ३ हजार ५९३, शेततळे ७८३, शोषखड्डा १२, संरक्षण भिंत ५ व सार्वजनिक विहिरी ५५ अशी एकूण पंचायत समिती आणि तहसीलअंतर्गत ८ हजार ५५३ कामे अपूर्ण आहेत.