
बुलढाणा जिल्ह्यात किनगावराजाजवळ भरधाव आयशर आणि शिवशाही बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर 21 प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या किनगावराजा गावाजवळ शनिवारी रात्री घडली.
शिवशाही बस छत्रपती संभाजीनगरवरून रिसोडला जात होती. तसेच आयशर मेहकरहून छत्रपती संभाजीनगरला जात होता. किनगावराजा गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपानजीक दोन्ही वाहनांची समारोसमोर धडक झाली. या अपघातात आयशर चालक अरमान एस. शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) व अन्य एकजण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारासाठी जालना येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातात शिवशाही बसचालक के. टी. देशमुख, वाहक जी. एल. नेहवाल यांच्यासह 21 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
शिवशाही बसमधून एकूण 21 प्रवासी प्रवास करत होते. सिंदखेडराजाजवळ नालासोपारा – वाशीम ही बस ब्रेकडाऊन झाल्यामुळे या बसमधील 7 ते 8 प्रवासीही शिवशाही बसमध्ये होते. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. मात्र, सर्व प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.