
गाझा पट्टी विकत घेण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. परंतु आता त्यांच्याविरोधात जाऊन इजिप्तने गाझाच्या पुननिर्माणाची जबाबदारी घेण्याची घोषणा केली आहे. तसेच पॅलेस्टिनींना बाहेर न काढता गाझा पट्टीचा विकास करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, फ्रान्स आणि जर्मनीने या प्रकरणी इजिप्तला पाठिंबा दर्शवला आहे.
इजिप्तचे वृत्तपत्र अल अहराममध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. गाझा पट्टीतील इमारतींचे ढिगारे हटवून या ठिकाणी पुन्हा घरे बांधण्याचा तसेच गाझा पट्टीचे पुननिर्माण करण्यात येईल. पॅलेस्टिनींना कुठेही जाण्याची गरज नाही, असे इजिप्तने म्हटले आहे. या प्रकरणी इजिप्तच्या प्रशासकीय अधिकाऱयानी सौदी अरेबिया, कतार आणि यूएई या देशांतील दूतावासातील अधिकाऱयांशी चर्चा सुरू केल्याचेही वृत्त आहे.
मध्य पूर्वेतील देश पैसा उभारणार
इजिप्त सध्या काही युरोपीय देश आणि सौदी अरब, कतार तसेच संयुक्त अरब अमीरात या मध्यपूर्वेतील देशांसोबत गाझापट्टीच्या पुननिर्माणाबाबत चर्चा करत आहे. या योजनेसाठी मोठय़ा प्रमाणावर पैसा उभारण्यात येणार आहे.दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गाझातून जवळपास 20 लाख पॅलेस्टिनींना हटवणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या घोषणेला मध्यपूर्वेतील देशांनी कडाडून विरोध केला होता.