भाजपच्या माजी आमदारावर फेकली अंडी; अज्ञातांविरोधात गुन्हा

कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजप आमदार मुनीरथना यांना बुधवारी बेंगळुरूमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अज्ञात लोकांनी अक्षरशः अंडी मारली. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बेंगळुरू येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बेंगळुरूतील लक्ष्मीदेवी नगर भागातील लगरे येथे आयोजित कार्यक्रमात मुनीरथना सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाहून परताना भाजपच्या आमदारावर अंडी फेकल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे.

माजी मंत्री सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सोशल मीडियावर हा व्हिडीओला व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, आरआर नगरचे आमदार वाजपेयींच्या जयंती सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या कारकडे जात असताना ही घटना घडली.

व्हिडीओमध्ये, आमदार त्यांच्या सहकाऱ्यांसोबत आणि काही पोलिसांसह चालताना दिसत आहेत. याचवेळी त्यांच्या डोक्यावर अंडी पडल्याचे दिसत आहे.

याप्रकरणी नंदिनी लेआऊट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर आपल्याला जळजळ होत असल्याचे सांगून, भाजपच्या माजी आमदाराने मल्लेश्वरमजवळील केसी जनरल हॉस्पिटल गाठले. पोलीस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनीरथना मध्यरात्रीपर्यंत रुग्णालयातच होते.