माघारीसाठी भाऊ आणि दादांची कुठे आळवणी तर कुठे ओवाळणी

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बंडोबांना शांत करण्याचे मोठे आव्हान राजकीय पक्षांपुढे उभे ठाकले आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडखोरांच्या मनधरणीसाठी देवाभाऊ आणि अजितदादांकडून प्रयत्न सुरू आहेत. बंडखोरीमुळे महायुतीचे 35 उमेदवार अडचणीत सापडले आहेत. यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधातील बंड शमविण्यासाठी कुठे आळवणी, तर कुठे राज्यात पुन्हा सत्ता आल्यास मानाच्या पदाची ओवाळणी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोनच दिवस राहिल्याने बंडोबांच्या गाठीभेटींना वेग आला असून सोमवार दुपारपर्यंत नाराजांच्या पत्रिकेत लक्ष्मीदर्शनाचा योग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाविकास आघाडीपेक्षा सत्ताधारी महायुतीत मोठय़ा प्रमाणत बंडखोरी झाली आहे. भाजपच्या 52 जणांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविले आहे, तर शिंदे गटाच्या 12 आणि अजित पवार गटाच्या 16 जणांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महायुतीच्या  विधानसभेच्या 35 हून अधिक जागा धोक्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यामध्ये एकमेकांच्या विरोधातील 25 जागांवरील उमेदवारांच्या माघारीसाठीची रणनीती ठरविण्यात आली. यामध्ये ज्या उमेदवारांचा महायुतीच्या मताच्या आघाडीवर परिणाम होऊ शकतो अशा बंडखोरांशी पुढील दोन दिवसांत चर्चा करण्यात येईल. बंडखोरांचे अर्ज माघारी घेण्यासाठी तिन्ही पक्षांतील काही वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबर पेंद्रातील काही प्रमुख नेते आणि राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सांगलीत पाठवले चार्टर्ड फ्लाईट

सांगली विधानसभेत भाजपच्या शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईहून सांगलीला थेट चार्टर्ड फ्लाईट पाठवले, मात्र पप्पू डोंगरे यांनी फडणवीसांचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावत फ्लाईटमध्ये बसण्यास नकार दिला. जतमधून बंडखोरी करणाऱ्या गौडा रवी पाटील यांनीही उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील जतमध्ये जाऊन त्यांची भेट घेणार आहेत.

गोपाळ शेट्टींना समजविण्याची जबाबदारी तावडेंवर

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बोरिवली विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करणारे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तावडे यांनी शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सध्या तरी शेट्टी अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे समजते.

महायुतीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही याची काळजी भाजपकडून घेतली जात आहे.  दिंडोरी आणि देवळालीत शिंदे गटाने उमेदवारांना एबी अर्ज दिले आहेत. त्यांच्या माघारीसंदर्भात चर्चा सुरू असून 4 नोव्हेंबरपर्यंत तोडगा निघेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

मतदारसंघात केलेल्या खर्चाचे काय?

विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या पक्षातील काही नेत्यांना दिले होते. त्यामुळे दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या काळात इच्छुकांना मोठय़ा प्रमाणात आपापल्या मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे खर्च केले. उमेदवारी मागे घ्यायची तर मतदारसंघात केलेल्या खर्चाचे काय, अशी विचारणा बंडखोर करू लागले आहेत.

नाना काटेंशी अजित पवारांची चर्चा

चिंचवड मतदारसंघात भाजपकडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना काटे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तसेच पक्षाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर नाना काटे हे उमेदवारी अर्ज मागे घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

समीर भुजबळांसाठी दिल्लीतून प्रयत्न

नांदगावमधून समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या माघारीसाठी दिल्लीतील भाजपच्या नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते.

विदर्भातील बंडखोरांसाठी फडणवीस सरसावले

विदर्भातील बंडखोरी भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. 12 प्रमुख मतदारसंघांत भाजपमध्ये बंडाळी झाली आहे. त्यामुळे मतविभाजनाचा मोठा धोका भाजपला बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्रीच नागपूरमध्ये दाखल झाले आणि मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत भाजपच्या बंडखोरांशी ‘देवगिरी’ बंगल्यावर चर्चा केली.