जगविख्यात शास्त्रज्ञ न्यूटन आणि आइनस्टाईन यांनी मांडलेल्या नियमांच्या सूत्रापेक्षाही मला शिक्षण म्हणजे भविष्य (ई = एफ) हे सूत्र अधिक श्रेष्ठ वाटते. मी जे काही आहे ते या सूत्राचे जिवंत उदाहरण आहे, अशी भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शनिवारी व्यक्त केली.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळय़े यांच्या संकल्पनेतील ‘माझा (डॉक्टरेट) पुरस्कार’ डॉ. माशेलकर यांना निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दादरच्या शिवाजी मंदिरात हा कार्यक्रम झाला.
‘आपल्याला 51 डॉक्टरेट पदव्या मिळाल्या आहेत, पण आज मुळय़ेकाका विद्यापीठाची ही 52 वी डॉक्टरेट मला खूप महत्त्वाची वाटते,’ असे डॉ. माशेलकर यांनी यावेळी नम्रपणे सांगितले. तिसरी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आईची प्रेरणा आपल्या जीवनात होती. मुंबईमध्ये अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते रतन टाटा आणि आपल्याला पद्म पुरस्कार मिळाला, तो जीवनातला अत्युच्च क्षण होता, हे सांगताना डॉ. माशेलकर भावुक झाले.
आई अंजनी माशेलकर फाऊंडेशनच्या माध्यमातून गरीबांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण सहजपणे कसे उपलब्ध होईल हे आपण पाहत आहोत, असे त्यांनी सांगितले. आपण पारंपरिक ज्ञानाचे डिजिटल वाचनालय विकसित केले असून त्यात तीन कोटींपेक्षा जास्त संदर्भ आहेत. या संदर्भ वाचनालयाचा उपयोग जगातल्या सगळय़ा पेटंट कार्यालयांना करावा लागतो, अशी माहिती डॉ. माशेलकर यांनी दिली.
माझा पुरस्काराचे हे 18 वर्षे असून या माध्यमातून आपण विविध क्षेत्रांतील निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱया व्यक्तींचा सत्कार करतो. देशाची विज्ञानातूनच प्रगती साध्य होऊ शकते. त्यामुळे देशाचे बहुमान असलेल्या डॉ. माशेलकर यांना मुंबईकरांतर्फे सन्मानित करण्याचा विचार मनात आला. – अशोक मुळय़े, ज्येष्ठ रंगकर्मी