खटल्याला उशीर लागू शकतो या कारणासाठी आरोपीला शिक्षण घेण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
हा निर्वाळा देत न्या. शिवकुमार दिघे यांनी विनयभंगाचा आरोप असलेल्या आरोपीला परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यास परवानगी दिली आहे. हर्षवर्धन दंड असे या आरोपीचे नाव आहे. त्याला अमेरिकेत एमबीए करायचे आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे.
महानगर दंडाधिकारी न्यायालयाने हर्षवर्धनला परवानगी नाकारली होती. त्यासाठी हर्षवर्धनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने हर्षवर्धनची मागणी मान्य केली. हर्षवर्धनने परदेशातील वास्तव्याचा पत्ता तपास अधिकाऱयाला द्यावा. हिंदुस्थानात आल्यानंतर हर्षवर्धनने खटल्याला हजेरी लावावी, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
खटल्यामुळे शिक्षण रोखणे अयोग्य
खटला प्रलंबित आहे या कारणासाठी हर्षवर्धनचे पुढील शिक्षण रोखता येणार नाही. त्यामुळे त्याला उच्च शिक्षणासाठी दोन वर्षे परदेशात राहण्याची मुभा दिली जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
माझे नुकसान होईल
हर्षवर्धनला अमेरिकेत एमबीए करायचे आहे. त्यासाठी त्याला अमेरिकत जाण्याची परवानगी दिली नाही तर त्याचे नुकसान होईल. हर्षवर्धन मुंबईकर आहे. त्याचे आईवडील येथेच राहतात. तो नसताना खटल्याची सुनावणी घेण्यास त्याची काहीच हरकत नाही. परदेशातून आल्यावर तो खटल्याला हजर राहील, असे अॅड. रुसी जीजीना यांनी न्यायालयाला सांगितले.
खटला थांबेल
हर्षवर्धनला परदेशात जाण्याची परवानगी दिली तर तो फरार होऊ शकतो. खटल्याला विलंब होऊ शकतो. या सर्वाचा विचार करता त्याचा अर्ज रद्द करावा, असे सरकारी वकील संगीता शिंदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ते न्यायालयाने मान्य केले नाही.
तारखेनुसार सुनावणी
जुलै, डिसेंबर-2025, जुलै-2026 या काळात हर्षवर्धन भारतात येणार आहे. त्याचवेळी खटल्याची सुनावणी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने महानगर दंडाधिकारी यांना दिले आहेत.