
प्रथमच आयपीएलचा उद्घाटन सोहळा आणि समारोप आयोजित करण्याची संधी इडन गार्डन्सला लाभल्यामुळे या ऐतिहासिक मैदानावर आयपीएलला रंगारंग आणि दिमाखदार सोहळा होणार हे पक्के आहे. हा धमाका करण्यासाठी श्रद्धा कपूर, वरुण धवनसह सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग, श्रेया घोषाल, तसेच दिशा पटनीसारखे कलाकार अर्ध्या तासांच्या कार्यक्रमात आपले रंग भरणार आहेत. आयपीएलच्या उद्घाटन सोहळय़ाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याचे बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी स्पष्ट केले. मात्र संस्मरणीय कार्यक्रमाची बीसीसीआयकडून तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
आयपीएलचा रंगमंच अवघ्या हिंदुस्थानलाच नव्हे, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना आपल्या झंझावाती खेळाने मोहित करत आलाय. त्यामुळे या भव्य आणि दिव्य क्रिकेट लीगचे उद्घाटनही नेहमीसारखेच यादगार असणार यात तीळमात्र शंका नाही. गेल्या वर्षी आयपीएलच्या उद्घाटन सोहळय़ाला अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनू निगम आणि ए.आर. रहमानसारख्या दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. यंदाही असेच दिग्गज आपली अदाकारी आणि कलाकारी सादर करणार असल्याचे समोर आले आहे. या सोहळय़ाला श्रद्धा कपूरचाही स्पेशल परफॉर्मन्स असल्याचे कळले आहे. येत्या 22 मार्चला 25 मिनिटांचा भन्नाट कार्यक्रम होणार आहे. यजमान कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील उद्घाटनीय सामन्यापूर्वी बॉलीवूडची फोडणी दिली जाणार आहे. तसेच 25 मे रोजी आयपीएलच्या 18व्या मोसमाला निरोपही याच मैदानावर दिला जाईल. तब्बल दोन महिने रंगणाऱया क्रिकेटच्या या रनधुमाळीत 13 शहरांमध्ये 74 सामने खेळविले जाणार आहेत. जसे कोलकात्यात दोन महत्त्वाचे सामने खेळविले जाणार आहेत तसेच प्ले ऑफच्या दोन सामन्यांचा थरार हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे.