दिल्लीत छापेमारीदरम्यान ईडीच्या पथकावर हल्ला

दिल्लीत सायबर फसवणुकीशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात एका फार्म हाऊसवर ईडीच्या पथकाने धडक दिली. यावेळी कारवाई सुरू असताना पथकावर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक अधिकारी जखमी झाल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱयांनी दिली. हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. बिजवासन परिसरात ही घटना घडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपासशेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱया फार्म हाऊसवर छापेमारी करण्यात आली. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असणाऱया अशोक कुमार याच्या फार्म हाऊसवर कारवाई करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱयांनी एका बाजूला कारवाई सुरू आहे आणि दुसऱया बाजूला तुटलेली खुर्ची पडली आहे, असा फोटो एक्सवरून शेअर केला आहे. ईडीचे सहाय्यक संचालक सुरज यादव यांच्या नेतृत्वाखालील पथक कारवाईसाठी गेले होते. हल्ल्यात एक अधिकारी किरकोळ जखमी झाला. परंतु, या हल्ल्यानंतरही छापेमारी सुरूच होती, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱयांनी दिली.