सीबीआयने ईडीचे अधिकारी विशाल दीप यांचा लाचप्रकरणी ताबा मागितला होता. पण मुंबईच्या विशेष कोर्टाने सीबीआयची ही मागणी फेटाळली आणि 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर विशाल दीप यांना जामीन मंजूर केला.
विशाल दीप यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. हिमाचल प्रदेशच्या स्कॉलरशिप घोटाळ्यात लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने 22 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने दीप यांना कोर्टात हजर केले आणि त्यांची दोन दिवसांसाठी कोठडी मागितली. पण दीप यांच्या वकिलाने सीबीआयच्या मागणीला विरोध केला. तसेच आपल्या अशीलाची अटक बेकायदेशीर असून हा व्यापक कटाचा भाग असल्याचे कोर्टाला सांगितले.
सीबीआयमधील घोटाळ्याची दीप चौकशी करत आहेत. यावरून दीप यांच्यावर बड्या अधिकाऱ्यांकडून दबाव असल्याचा दावा दीप यांचे वकील मुदित जैन यांनी केला आहे.
स्कॉलरशिप घोटाळ्याचा तपास करू नये म्हणून सीबी अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले आहे. तसेच दीप गेल्या दोन महिन्यांपासून ते या घोटाळ्याप्रकरणी स्टिंग ऑपरेशन करत असल्याचेही वकिलांनी सांगितले.
कोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सीबीआयची मागणी फेटाळून लावली. तसेच दीप यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हणत त्यांना जामीन मंजूर केला.