
विरोधी पक्षातील नेत्यांना ईडीच्या नोटिसा येत आहेत. म्हणजे पुन्हा भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. हवा टाईट झाली आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला.
नाशिक येथे मंगळवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या निर्धार शिबिराची तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली. उद्या दुपारपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकला पोहोचतील, असे सांगितले. रॉबर्ट वढेरा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा आमच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना नोटिसा येत आहेतच, याचाच अर्थ पुन्हा एकदा भाजपची हवा टाईट झाली आहे, असे ते म्हणाले. ईव्हीएमच्या माध्यमातून निकाल फिरवून, मतदार यादीत घोटाळे करून भाजप जिंकले, हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरो अध्यक्षा तुलसी गेबार्ड यांनी सांगितलेच आहे. खरं तर यांना कुणीही मतदान केलेले नाही. चंद्रकांत पाटील यांना तर नाहीच. आम्हाला त्यांच्यासोबत सत्तेत अजिबातच जायचे नाही. त्यांनी आपल्या खुर्च्या टिकवाव्यात, असे ठणकावून सांगितले.
कॅबिनेटमधील ‘त्या’ आकालाही हाकला
सिंधुदुर्ग जिह्यात भररस्त्यावर हत्या होत असताना मुख्यमंत्री फडणवीस हे फक्त राजकारण करीत आहेत. हत्याकांडामागे कोणती राजकीय शक्ती आहे, त्यांचा आका कोण, याविषयी आमचे वैभव नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलेच पाहिजे, असे ते म्हणाले. या जिह्यात आतापर्यंत 27 निर्घृण खून झाले असून, त्यातील 9 आमच्याच शिवसैनिकांचे आहेत. अजित पवार यांनी बीडचा आका जसा बाहेर काढला, तसाच कॅबिनेटमध्ये बसलेल्या या आकालाही तुम्ही बाहेर हाकला, असे आव्हान दिले.