सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्र्यावर ED ची कारवाई, एकाचवेळी 17 ठिकाणी टाकले छापे

बिहारमधील माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे विद्यमान आमदार अलोक कुमार मेहता यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीने या प्रकरणी 17 ठिकाणी छापे टाकत कारवाई सुरू केली आहे.

आलोक मेहता हे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार असताना ते महसूल मंत्री होते. पक्षातील अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. अलोक मेहता हे समस्तीपूरमधील उजीयारपूरचे आमदार आहेत.

वैशाली सहकारी बँकेशी संबंधित हे प्रकरण आहे. कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या या कारवाईने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. ईडीच्या पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. बँकेच्या कर्जाशी संबंधित प्रकरणात कोट्यावधींचा व्यवहार प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

ईडीच्या टीमकडून पाटणा, हाजीपूरमध्ये 9 ठिकाणी, कोलकातामध्ये 5 ठिकाणी, वारणसीत 4 आणि दिल्लीत एका ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. वैशाली शहर विकास सहकारी बँकेतील 85 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई केली जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानंतर या प्रकरणी हाजीपूरमध्ये तीन एफआयआर दाखल झाले आहेत.