ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळाप्रकरणी सुरेश कुटेंची 1433 कोटींची मालमत्ता जप्त, ED ची मोठी कारवाई

ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 1433 कोटी 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

सुरेश कुटे आणि त्यांची पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास 2470 कोटी रुपये गोळा केले. ठेवीदारांना 12 ते 14 टक्के व्याजदराचा परतावा देण्याचे आश्वासन दिले. पण या ठेवींचा अपहार करत कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जांच्या स्वरूपात रक्कम वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी एमपीआयडी कायद्यांतर्गत जुलै 2024 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे.