
दामदुप्पट करण्याच्या नादात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मात्र, ओळखीच्या संबंधातून गंडा घालण्याचे प्रकार सुरूच आहेत. कर्नाटकात उपमुख्यमंत्र्यांची बहीण असल्याचे सांगून 20 कोटी रुपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली. श्रीमंत लोकांना लक्ष्य करत त्यांची आर्थिक फसवणूक आणि मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी ईडीने ऐश्वर्या गौडा (वय – 33) या तरुणीला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर गौडाला पुढील चौकशीसाठी दोन आठवड्यांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे.
गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आश्वासन देत पीडितांची फसवणूक केल्याचा आरोप गौडावर आहे. आरोपी ऐश्वर्या गौडा श्रीमंत डॉक्टर आणि व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते डी. के. सुरेश यांची बहीण असल्याचे सांगत होती. गेल्या वर्षी बंगळुरू पोलिसांनी फसवणुकीच्या चार प्रकरणांमध्ये ऐश्वर्या गौडावर गुन्हा दाखल केला.
ऐश्वर्याने पोलिसांचा वापर करून ज्वेलरी स्टोअर मालक असलेल्या वनिता ऐथल यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळवल्याचा आरोप आहे. वनिता ऐथल यांनी गौडावर उच्च परताव्याचे आश्वासन देत 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. ज्वेलर्स व्यतिरिक्त, गौडाने फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्यांमध्ये प्लास्टिक सर्जरी सेंटर चालवणारे दोन डॉक्टर, एक प्रसूती डॉक्टर आणि मंड्या येथील एका व्यावसायिक कुटुंबाचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऐश्वर्या गौडा डॉक्टर, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीमंत रिअल इस्टेट डीलर असल्याचे सांगायची. यासाठी तिने उत्तर बंगळुरुमधील एका आलिशान हॉटेलमधील एका सूटचा वापर केला होता, जेणेकरून ती खूप श्रीमंत असल्याचे दिसून येईल. याचबरोबर तिच्याकडे अंगरक्षक आणि आलिशान गाड्यांचा ताफाही होता.
ज्या राजकीय नेत्यांवर, ते आरोपी ऐश्वर्या गौडाशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे, त्यामध्ये काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांचा समावेश आहे. ईडीने गौडा प्रकरणाच्या संदर्भात आमदार कुलकर्णी यांच्या मालकीच्या जागेवर छापे टाकले होते.