माझ्याकडून कर्जापेक्षा दुप्पट रक्कम वसूल केली, तरीही मी आर्थिक गुन्हेगार; अर्थमंत्र्यांच्या माहितीनंतर मल्ल्याची प्रतिक्रिया

हिंदुस्थानी बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याकडून 14 हजार 13.6 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी संसदेत ही माहिती दिली होती. यावर मल्ल्याने प्रतिक्रिया दिली आहे. जेवढं कर्ज होतं, त्यापेक्षा दुप्पट रक्कम ईडीने वसूल केली आहे. तरी मला फरार आर्थिक गुन्हेगार म्हटलं जातंय असं माल्याने म्हटलं आहे.

मल्ल्याने एक्सवर पोस्ट करून म्हटलं आहे की डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलने किंगफिशर एअरलाईन्सवर 6 हजार 203 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले होते. त्यात 1200 कोटी रुपयांचे व्याजाचाही समावेश होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितले की ईडीच्या माध्यमातून बँकांनी 6 हजार 203 कोटी रुपये कर्ज असताना माझ्याकडून 14 हजार 131.60 कोटी रुपये वसूल केले. त्यानंतरही मला फरार आर्थिक गुन्हेगार ठरवले जात आहे. मी घेतलेल्या कर्जापेक्षा दुप्पट रक्कम माझ्याकडून वसूल केली गेली, हे न्यायाला धरून नाही. याबाबत योग्य तो न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे मल्ल्याने म्हटले आहे.