दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहिले. अबकारी धोरण प्रकरणी चौकशीसाठी ईडीने केजरीवाल यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवून 3 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु केजरीवाल यांनी ईडीला एक खरमरीत पत्र पाठवून 26 जानेवारीपर्यंत कार्यक्रमात व्यस्त असल्याने आपण चौकशीसाठी ईडी कार्यालयात येऊ शकत नाही. जर ईडीला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी लिखित स्वरूपात विचारावे, त्या सर्व प्रश्नाला उत्तर दिले जाईल, असे नमूद केले आहे.
मी खरोखर आश्चर्यचकीत झालो आहे. मी विचारलेल्या प्रश्नांचे ईडीकडून अद्याप कोणतेही उत्तर मिळाले नाही. पुन्हा आधीच्या समन्सशी मिळतेजुळते समन्स मला पाठवले आहे. ईडीचे वागणे मनमानी आहे. त्यात पारदर्शकपणा दिसत नाही, असे केजरीवाल यांनी पत्रात नमूद केले आहे. मी आधीच सांगितले आहे की, मी कायद्याचा सन्मान करतो. तपासासाठी सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. परंतु मी विचारलेल्या प्रश्नावर ईडीने मौन धरणे योग्य नाही. मला अशी अनेक प्रकरणे माहिती आहेत. ज्यात समन्स मिळालेल्या व्यक्तीला ईडीने सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे मी पुन्हा ईडीला विनंती करेन की, ईडीने माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यावे. म्हणजे मला या समन्ससंबंधी सविस्तर जाणून घेता येईल, असेही त्यांनी पुढे नमूद केले.