
सत्ताधारी आणि भाजप नेत्यांना सोडून केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करणाऱ्या सक्तवसुली संचालनालय (ईडी)ने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्यावर शुक्रवारी कारवाई करत त्यांचे 27.5 कोटी रुपयांचे शेअर्स तात्पुरते जप्त केले. मनी लॉण्डरिंगच्या 14 वर्षे जुन्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांचे जुने प्रकरण बाहेर काढून ईडीने अनेक नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली आहे. 2014 पासून ईडीने केलेल्या कारवायांमध्ये 98 टक्के कारवाया या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केल्या आहेत.
सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या हैदराबादच्या टीमने जगन यांच्या कार्मेल एशिया होल्डिंग्ज, सरस्वती पॉवर अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हर्षा फर्म या तीन कंपन्यांतील गुंतवणूक जप्त केली. याशिवाय, दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड (डीसीबीएल) ची जवळपास 377.2 कोटी रुपयांची जमीनदेखील जप्त करण्यात आली आहे. सीबीआयने एप्रिल 2013 मध्ये जगन, डीसीबीएल आणि इतरांविरुद्ध आयपीसी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली आरोपपत्र दाखल केले होते. जगन मोहन, त्यांचे ऑडिटर आणि माजी खासदार व्ही. विजय साई रेड्डी आणि डीसीबीएलचे पुनीत दालमिया यांनी मिळून रघुराम सिमेंटचे शेअर्स फ्रेंच कंपनी पीएआरएफआयसीआयएमला 135 कोटी रुपयांना विकल्याचा आरोपही आहे. यात त्यांना 16 मे 2010 आणि 13 जून 2011 या दरम्यान हवालामार्फत 55 कोटी रुपये मिळाले. हे प्रकरण 2011 मध्ये सीबीआयने दाखल केलेल्या एका प्रकरणाशी जोडलेले आहे.