
न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) अभिजित देशमुख यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. अभिजित देशमुख यांनी 2019 ते 2021 या दोन आर्थिक वर्षांचे बँकेचे ऑडिट केले होते. शिवाय बँकेवर प्रशासक नेमल्यानंतर आरबीआयने याच देशमुखांची बोर्डावर नियुक्ती केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
संजय राणे व असोसिएट फर्मचे सीए अभिजित देशमुख यांनी नेमके कसे आणि काय ऑडिट केले. शिवाय त्यांनी बँकेला ‘अ’ ग्रेट देखील तेव्हा दिला होता. तो कुठल्या आधारावर देण्यात आला. त्यातच बँकेतील 122 कोटींचा अपहार झाल्यानंतर आरबीआयने बँकेवर प्रशासक नेमला. त्या बोर्डावर तीनचार दिवसांपूर्वी अभिजित देशमुख यांची नेमणूक करण्यात आली. त्यामुळे देशमुख यांची चौकशी होणे गरजेचे असल्याने त्यांना तपास पथकाने समन्स धाडून बोलावले आहे. तिसरा आरोपी अरुण भाई याला पकडण्यासाठी पथक मुंबईबाहेर गेल्याचे समजते.
आरबीआय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बँकेत जाऊन तपासणी केली होती. त्यावेळी हितेश मेहता याने या अपहाराची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आरबीआयकडे असून त्याची मागणी पोलिसांनी केली आहे. शिवाय आरबीआयच्या संबंधित अधिकाऱ्यांचा जबाब घेतला जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
माजी सीईओ बोमान यांची चौकशी
या प्रकरणात बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू बोमान यांची आज तपास पथकाने चौकशी केली. त्यांच्याकडे विचारणा करून त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला.
पाच वर्षांचे ऑडिट अहवाल पोलिसांच्या हाती
122 कोटींचा अपहार झाल्यानंतर 2019 ते 2024 या पाच आर्थिक वर्षांचे ऑडिट कोणी केले होते, त्याचा अहवाल तपास पथकाला हवा होता. अखेर जनरल मॅनेजर ऑडिट वेर्णेकर यांनी मंगळवारी संध्याकाळी गेल्या पाच वर्षांचे ऑडिट अहवाल पोलिसांकडे सुपूर्द केले. पहिल्या दोन आर्थिक वर्षांचे ऑडिट सीए अभिजित देशमुख यांनी केल्याचे तसेच आरबीआयने बँकेवर प्रकाशक नेमल्यानंतर त्या बोर्डावर देशमुख यांना नियुक्त केल्याचे समोर येताच पोलिसांनी देशमुख यांना चौकशीसाठी बोलावले आहे.