<<<आशीष बनसोडे>>>
आली दिवाळी… सुबक पणत्यांची, आकर्षक आकाश कंदिलांची, सुगंधी उटणे, विविध छटांच्या रांगोळ्यांची अन् मोहक अशा तोरणांची… प्रत्येकाच्या घराची दारे या वस्तूंनी सजू, नटू लागली आहेत. बाजारपेठाही या आकर्षक वस्तूंनी सजल्या आहेत, पण राज्यातील 300 हून अधिक कैद्यांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक पणत्या, कंदील आदी वस्तू नागरिकांच्या चांगल्याच पसंतीस पडू लागल्या आहेत.
कळत-नकळत गुन्हा घडल्यामुळे काहींना कारागृहात जावे लागते. शिक्षा नाही, तर सुधारण्यासाठी गुन्हेगारांना कारागृहात ठेवले जाते. त्यामुळे कारागृहातदेखील कैद्यांना त्यांच्यातल्या सुप्त गुणांना सादर करण्यास वाव मिळतो. विविध माध्यमे व सणावाराला कैद्यांना काहीतरी नवीन करून दाखविण्याची कारागृहातून संधी दिली जाते. यंदाही राज्यातील पाच कारागृहांतील 300 हून अधिक कैद्यांना दिवाळीनिमित्त त्यांच्यातली कला दाखविण्याची संधी मिळाली.
गुन्हा केला म्हणून ज्या हातात बेड्या पडल्या त्याच हातांनी हे शेकडो पैदी अगदी मनापासून कुठलीही तक्रार न करता पर्यावरणपूरक अशा पणत्या, आकाश कंदील, तोरणं, रांगोळ्या, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी झटले. म्हणून या कैद्यांच्या कलाकुसरीतून बाजारात या सुबक व आकर्षक वस्तू नागरिकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने कैद्यांनी या आकर्षक वस्तू बनवल्या आहेत. कारागृह प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी मेळावे आयोजित करून तेथे या वस्तू तसेच कपडे, खाद्यपदार्थ आदी वस्तूदेखील उपलब्ध करून देत आहेत. बाजारात विविध वस्तू उपलब्ध असल्या तरी कैद्यांनी बनविलेल्या वस्तूंना विशेष मागणी होत आहे.
कुठल्या कारागृहातील कैद्यांकडून वस्तूंची निर्मिती
राज्यातील अमरावती, कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि येरवडा कारागृहातील मिळून 300 हून अधिक कैद्यांनी या वस्तूंबरोबर, कपडे, साड्या, चादरी आदी वस्तू बनवल्या आहेत. कोणाला भेटवस्तू देण्यासाठी तसेच आपले घर, कार्यालय आदी ठिकाणी सजावट करण्यासाठी या वस्तूंना नागरिकांकडून पसंती मिळत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.