महाविकास आघाडीचे नाव वापरणाऱ्या शेकापच्या बंडखोरांना दणका, मतदारांची दिशाभूल करणारे होर्डिंग हटवण्याचे आदेश

उरण आणि पनवेल विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अधिकृत उमेदवार दिले असताना शेतकरी कामगार पक्षाचे दोन बंडखोर उमेदवार आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे भासवून मतदारांची दिशाभूल करत आहेत. मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पह्टो असलेले होर्डिंग त्यांनी जागोजागी लावले आहेत. त्याविरोधात स्थानिक अधिकारी आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे शिवसेनेने तक्रार केली असून आयोगाने त्याची गंभीर दखल घेत दोन्ही उमेदवारांना होर्डिंग हटवण्यासाठी नोटीस बजावली आहे.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याकडे तर शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी उरण आणि पनवेलच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे.

उरणमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे मनोहर भोईर हे अधिकृत उमेदवार आहेत. तिथे शेकापचे प्रीतम म्हात्रे हेसुद्धा लढत आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नसतानाही म्हात्रे हे प्रसिद्धीपत्रक आणि होर्डिंगवर महाविकास आघाडीचे नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे फोटो लावत आहेत. असाच प्रकार पनवेल मतदारसंघातही सुरू आहे. पनवेलमध्ये लीना गरड या महाविकास आघाडी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असताना शेकापचे बंडखोर बाळाराम पाटील आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा मतदारांची आणि कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार असून यावर कारवाई करून होर्डिंग हटवण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आज निवडणूक आयागोकडे करण्यात आली.

निवडणूक आयोगाकडून तातडीने दखल

शिवसेनेच्या तक्रारीची आयोगाने तातडीने दखल घेतली आहे. आयोगाने प्रीतम म्हात्रे आणि बाळाराम पाटील यांना नोटीस बजावून संबंधित होर्डिंग हटवण्यास सांगितले आहे. होर्डिंग हटवले गेले नाही तर उद्यापासून आयोग कारवाई करेल, असेही या नोटिसीत बजावण्यात आले आहे.