ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्या हॅकरवर आयोगाकडून गुन्हा

विधानसभा निवडणुकीतील ‘ईव्हीएम हॅक’च्या मुद्दय़ावरून निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर कायम आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएम हॅक झाल्याचा ठाम दावा करीत आहेत, तर दुसरीकडे ईव्हीएमबाबतीत काहीच गैर न घडल्याचा दावा करणाऱ्या निवडणूक आयोगाने एका हॅकरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ईव्हीएमवरील संशयाचे धुके दाट झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद सुजाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती- तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ कॉलिंगवर दोन व्यक्ती कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंगबाबत चर्चा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओबाबत निवडणूक आयोगाने मुंबईतील दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच सोशल मीडियात स्पष्टीकरण देऊन ईव्हीएम हॅकिंगच्या दाव्याचे खंडन केले आहे. विरोधक टीका करीत असतानाच व्हिडीओ समोर आल्याने निवडणूक आयोगाची गोची झाली आहे.

ईव्हीएम बनवणाऱया कंपनीशी हॅकरचा संबंध

कथित हॅकर सुजाने ईव्हीएम विकसित करणाऱया इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ईसीआयएल) या कंपनीत 2009 ते 2014 या काळात काम केले होते. ईसीआयएल व भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सार्वजनिक मालकीच्या कंपन्या असून त्याच कंपन्या निवडणूक आयोगासाठी ईव्हीएमची निर्मिती करतात. व्हायरल व्हिडीओमुळे सुजा व ईसीआयएलची लिंक समोर आल्याने ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा संशय बळावला आहे.

आयोगाचे स्पष्टीकरण

व्हायरल व्हिडीओमुळे निवडणूक आयोग कात्रीत सापडला आहे. आयोगाने व्हिडीओवर सारवासारव करीत हॅकिंगचा दावा खोडून काढला आहे. व्हिडीओमधील व्यक्तीने ईव्हीएम हॅकिंगबाबत केलेला दावा निराधार, धादांत खोटा, बिनबुडाचा आहे. ईव्हीएम हॅक करता येत नाही, ईव्हीएम कोणत्याही फ्रिक्वेन्सीशी जोडू शकत नाहीत. कथित हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.

व्हायरल व्हिडीओत नेमके काय आहे?

हॅकरशी व्हिडीओ कॉलिंगवरून बोलणाऱया दोन व्यक्ती 105 पैकी 63 उमेदवारांना जिंकवून देण्याबाबत माहिती घेत आहेत. आम्हाला व्हीव्हीपॅट मशीनचा क्रमांक लागेल. 288 पैकी 281 मतदारसंघांत आम्हाला ईव्हीएमचा अॅक्सेस आहे. हॅकिंगसाठी ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी हायस्पीड इंटरनेट तसेच फिल्डवर काही माणसे लागतील. तसेच ईव्हीएम बंद असतानाही त्यावर ट्रान्समिशन होते, व्हीव्हीपॅट मशीनला आधीच हॅक करतो, असे हॅकरने सांगितल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट झाले आहे.

लोकशाहीवरील हा आणखी एक हल्ला

ईव्हीएममधील कथित घोटाळा हे सार्वभौम लोकशाही नष्ट करण्यासाठी होत असलेल्या हल्ल्यांपैकी एक आहे. पण 11 वर्षांपासून पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद न घेणे, विरोधी पक्षांची सरकारे उलथवणे, विरोध करणारे पक्षनेते, देशातील महिला कुस्तीगीर, शेतकरी यांची आंदोलने हिंसक मार्गाने चिरडण्याचा प्रयत्न करणे, तसेच मतदारांना खरेदी करून मतदान सत्ताधारी पक्षांना करून घेणे, या सर्वंकष हल्ल्यांविरुद्ध लोकशाहीप्रेमी जनतेचे आंदोलन उभे राहत असल्याचे उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी काढले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.