मुंबई इंडियन्सला जेतेपद मिळवून देणारी खेळाडू इंग्लंडची नवीन कर्णधार, ECB ने केली घोषणा

इंग्लंडच्या कर्णधारपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. आपल्या दमदार खेळाने सर्वांना प्रभावित करणारी आणि WPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपची मानकरी ठरलेली मुंबई इंडियन्सची नॅट स्किव्हर ब्रंटची इंग्लंडच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) याची अधिकृत घोषणा करत तिन्ही फॉरमॅटसाठी नॅट स्किव्हर ब्रंटवर संघाची जबाबदारी सोपवली आहे.

इंग्लंडची माजी कर्णधार हीथर नाईटने जवळपास 9 वर्ष संघांच सारथ्य केलं. 2025 साली महिला अॅशेज मालिकेनंतर ती कर्णधारपदावरुन पायउतार झाली होती. हीथर नाईटच्या जागी आता नॅट स्किव्हर ब्रंट इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडणार आहे. नॅट स्किव्हर ब्रंटने 2013 साली आंतरराष्ट्रीय स्तरावर इंग्लंडच्या माध्यमातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिने आपल्या खेळाची वेळोवेळी जादू दाखवली आहे. त्यामुळेच जगभरातील दिग्गज महिला खेळाडूंमध्ये तिच्या नावाचा समावेश केला जातो. आक्रमक फलंदाज आणि अचूक मारा करणारी गोलंदाज म्हणून तिने देशासाठी आणि लीग क्रिकेटमध्येही आपली छाप पाडली आहे.

नॅट स्किव्हर ब्रंटने 2021 साली न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात पहिल्यांदाच इंग्लंडच्या कर्णधारपदाजी जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये उपकर्णधार आणि 2017 च्या विश्वचषक विजेच्या संघाची ती भाग होती. नॅट स्किव्हर ब्रंटने इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये 259 सामने खेळले असून 7483 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 181 विकेट सुद्धा तिने घेतल्या आहेत.