चिया सीड्सचे अतिसेवन आरोग्यासाठी हाणीकारक? वाचा सविस्तर…

साल्विया हिस्पॅनिका या वनस्पतीपासून मिळणाऱ्या बिया म्हणजेच चिया सीड्स अतिशय पौष्टीक मानल्या जातात. तसेच चिया सीड्सचा वापर विविध पाककृतींमध्ये देखील केला जातो. अलिकडे तरूण पिढी तसेच डायटफ्रीक मंडळी पौष्टीक आहार म्हणून त्यांच्या डायटमध्ये चिया सीड्सचा समावेश करतात. पण याचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी हाणीकारक ठरू शकते.

चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅट्स असतात जे विशेषत: हृद्याच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. 2 चमचे चिया सीड्समध्ये 138 कॅलरीज, 5 ग्रॅम प्रथिने, 12 ग्रॅम कार्ब, 10 ग्रॅम फायबर आणि 179 मिलीग्रॅम कॅल्शिअम असते. या बियांमध्ये हेल्दी फॅट्स असतात जे ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करतात आणि रक्तातील एचडीएल म्हणजेच चांगले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात.

चिया सीड्स बहुतेकांसाठी पौष्टिक आहार असला तरी त्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. या बिया फायबरचा चांगला स्त्रोत आहेत. 28 ग्रॅम बिया सुद्धा 11 ग्रॅम फायबर प्रदान करतात. त्यामुळेच जास्त प्रमाणात फायबरचे सेवन झाल्यास त्यामुळे ओटीपोटात दुखणे, बद्धकोष्ठता, अतिसार, सूज येणे अथवा पोटात गॅस होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

शरीरात फायबरचे प्रमाण जास्त झाल्यास ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा क्रॉन्स डिसीज सारखे आतड्यांचे आजार आहेत त्यांना फायबरच्या सेवनावर बंधन ठेवावे लागते. अशा रूग्णांना चिया सीड्स प्रमाणात खावे. त्याचे प्रमाण वाढल्यास जळजळ होणे आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक अरूंद होण्याची शक्यता असते, ज्यामुळे ओटीपोटात दुखणे, रक्तस्त्राव, अतिसार आणि वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

काही लोकांना चिया सीड्स खाल्ल्यानंतर अॅलर्जी होण्याची शक्यता असते. या लक्षणांमध्ये देखील उलट्या, अतिसार आणि ओठ अथवा जिभेला खाज सुटू शकते. सीड्सचा परिणाम जास्त झाल्यास अॅनाफिलेक्सिस देखील होऊ शकते, ज्यामुळे श्वास कोंडू शकतो. त्यामुळे चिया सीड्सचे अतिसेवन आरोग्यासाठी हाणीकारक ठरू शकते.