सोलापूर जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के, पंढरपूरसह 3 तालुके थरथरले; नागरिकांची घराबाहेर धाव

सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी सोलापूर जिल्ह्याला हे धक्के बसल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 5 किलोमीटर खाली होते, तर सांगोला येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे गुरुवारी सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टल स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.6 एवढी मापण्यात आली. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यांनी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मात्र भूकंपाचे वृत्त समजताच नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली.

दरम्यान, याआधी मंगळवारी हिंदुस्थानातील पूर्व भागात असणाऱ्या कोलकाता, इंफाल येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते. 28 मार्च रोजी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के बिहारच्या सिलीगुडी आणि आसपासच्या भागातही जाणवले होते. तर 2 एप्रिल रोजी सिक्कीमच्या नामची येथे, 1 एप्रिलला लेह-लडाड आणि 31 मार्चला अरुणाचल प्रदेशमधील तवांग, शी योगी आणि सिक्कीममधील गंगटोकची जमिन भूकंपाने हादरली होती.