गुजरात येथील कच्छ येथे शनिवारी दुपारी 4:37 बाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल नोंदवली गेली. आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छमधील दुधईजवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कच्छमध्ये 3.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते, त्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. सकाळी 10.24 वाजता भूकंपाची नोंद झाली होती. एकाच आठवड्यात दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
भूकंप संशोधन संस्थेने (ISR) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत भचाऊ परिसराच्या जवळपास अनेक भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. 23 डिसेंबर 2024 रोजी कच्छ जिल्ह्यात 3.7 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि 7 डिसेंबर रोजी 3.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. 18 नोव्हेंबर 2024 रोजी कच्छमध्ये 4 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. 15 नोव्हेंबर रोजी उत्तर गुजरातमधील पाटणमध्ये 4.2 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते.
दरम्यान, गुजरातमध्ये याआधीही मोठ्या भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या (GSDMA) आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये गेल्या 200 वर्षांत नऊ मोठे भूकंप झाले. जीएससीएमनुसार, 26 जानेवारी 2001 चा कच्छचा भूकंप हा गेल्या दोन शतकांमध्ये हिंदुस्थानात झालेला तिसरा सर्वात मोठा आणि दुसरा सर्वात विनाशकारी भूकंप होता. त्या भूकंपात जिल्ह्यातील अनेक शहरे आणि गावे जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, ज्यामध्ये सुमारे 13,800 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 1.67 लाख लोक जखमी झाले होते.