जागतिक तापमानवाढीचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गहिरे होत असून या वर्षीचा ऑक्टोबर महिना हा गेल्या 175 वर्षांतील दुसऱ्यांदा उष्ण महिना ठरला आहे. ऑक्टोबरमध्ये जगातील सुमारे 12 टक्के भाग तापला. यामुळे कुठे महापूर व दुष्काळ, तर कुठे थंडीने लोकांना वेठीस धरले गेले, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक ऍण्ड ऍण्टमॉस्फेरिक ऍण्डमिनिस्ट्रेशन (नोआ) यांनी दिली आहे.
जागतिक तापमानवाढीच्या परिणामामुळे काही ठिकाणी ओला दुष्काळ, तर काही ठिकाणी सुका दुष्काळ पडत आहे. घराबाहेर पडल्यावर सर्वसामान्यांची उन्हाने काहिली होत आहे. ही तापमान वाढ टप्प्याटप्प्याने होत गेली आहे. 20 व्या शतकातील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी जागतिक तापमान 14 अंश सेल्सिअस आहे. त्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबरमधील तापमान 1.32 अंश सेल्सिअसने जास्त होते. याआधी 2023 मधील ऑक्टोबर महिना आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर महिना ठरला होता.
दिल्लीवर सर्वाधिक परिणाम
हवामान विभागानेही 1901 पासूनच्या हवामानविषयक नोंदीनुसार, यंदाचा ऑक्टोबर महिना आजवरचा सर्वात उष्ण महिना ठरल्याचे म्हटले आहे. राजधानी दिल्लीने आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण महिना अनुभवला. प्रदूषणाबरोबर तापमानवाढीनेही दिल्लीकर बेजार झाले होते.
जमिनीबरोबरच समुद्रही तापला
तापमानवाढीचा फटका आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेला बसला आहे. या देशांमध्ये गेल्या 175 वर्षांच्या हवामान इतिहासात पहिले दहा महिने सर्वाधिक उष्ण महिने ठरले. वाढत्या तापमानामुळे फक्त जमिनीवरील तापमानच नाही, तर समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानही वाढत आहे.
कुठे थंडी, तर कुठे महापूर व दुष्काळ
अमेरिकेत थंडीच्या महिन्यांमध्ये पश्चिमी थंड वाऱ्याचे झोत कमी प्रमाणात आल्यामुळे महासागरांच्या पृष्ठभागांच्या तापमानातही वाढ झाली. यामुळे जागतिक पातळीवरील हवामानाच्या पॅटर्नला मोठा धक्का बसला आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यात स्पेनमध्ये महापूर आला. त्यात 200 लोकांचा जीव गेला. फिलिफिन्समध्ये ट्रॉमी चक्रीवादळाने अतिवृष्टी, भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्यात 125 लोकांचा मृत्यू झाला, तर दक्षिण अमेरिकेला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला.