![Untitled design (14)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-14-696x447.jpg)
आपल्या नजाकतभऱ्या लेखणीने, भन्नाट आणि कल्पक सादरीकरणांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मंत्रमुग्ध करणारा अवलिया म्हणजे पप्पू संझगिरी. आपल्या लेखांत मनाला गुदगुल्या करणाऱ्या उपमांची अद्भुत पेरणी करणाऱ्या द्वारकानाथ संझगिरींच्या लेखणीला आणि त्यांच्या कल्पकतेला कला, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मित्र आणि चाहत्यांनी आंदराजली वाहिली.
आपल्या पाच दशकांच्या कारकीर्दीत क्रिकेट सामन्यांच्या समीक्षणापासून सुरू झालेल्या लिखाणाच्या कारकार्दीला एव्हरेस्टइतकी उंची गाठून देणाऱया द्वारकानाथ संझगिरी अर्थाच लाडक्या पप्पूला आदरांजली वाहण्यासाठी आज त्यांचे शेकडो मित्र, चाहते आणि कुटुंबीय दादरच्या सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात उपस्थित झाले होते. त्यांच्या आदरांजली सभेत खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई यांच्यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ज्येष्ठ बंधू नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, विलास गोडबोले, जयश्री देसाई, राजेश आजगावकर, संजय चुरी, नितीन चुरी, अजित देवल, पत्रकार अयाज मेमन, हेमंत कर्णिक, विजय साळवी, मीना कर्णिकसह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
संझगिरींनी आपल्या लेखणी आणि निवेदनाने क्रिकेट, संगीत आणि सिनेमांच्या कार्यक्रमांमध्येही जादूई कामगिरीने मोहित झालेल्या शेकडो मित्र परिवाराची उपस्थिती पाहून त्यांचे कुटुंबीय अक्षरशः भारावून गेले. संझगिरी यांनी आपल्या लेखांमध्ये क्रिकेट, सिनेमा, संगीत, राजकारणाचा अनोखा मिलाफ घडवून आणला. त्यांनी एखाद्या गंभीर विषयाचे आपल्या नजाकतभऱया शैलीत केलेले विश्लेषण, कधीही न ऐकलेले क्रिकेटपटूंची किस्से, सिनेकलाकारांची लफडी अगदी सहजतेने मांडत त्यांनी सर्व क्षेत्रात बिनधास्त संचार करत आपले अष्टपैलूत्व अवघ्या जगाला दाखवून दिल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. संझगिरी आता आपल्यात देहाने नाहीत, त्यांनी लिहिलेले लेख हे सदैव नव्या लेखकांना प्रेरणा देत राहतील, अशाही भावनाही व्यक्त करत संझगिरींचा विसर अशक्य असल्याचे सांगितले.
संझगिरींच्या लेखांचा संग्रह करावा – अरविंद सावंत
संझगिरींच्या लिखाणीची शैली अद्भुत होती. त्यांचे लेख म्हणजे शब्दशृंगारच. त्यांच्या या शृंगाराने साक्षात मधुबालाही भाळली असती. आम्हीही भाळलो. ते लेखात उपमांची असी पेरणी करायचे की, सामान्य वाचकही त्यांच्या प्रेमात पडायचे. त्यांनी गेल्या पाच दशकांत जे लेख लिहिलेत, त्यांचा संझगिरी संग्रह करून त्याचे एक पुस्तक तयार करायला हवे. ते पुस्तक भावी पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, अशा शब्दांत खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या मित्राला आदरांजली वाहिली.