>> द्वारकानाथ संझगिरी
न्यूझीलंडच्या मिचेल सॅण्टनरने पुण्यात दोन्ही डावांत एकहाती हिंदुस्थानी फलंदाजी उद्ध्वस्त केली. त्याने हिंदुस्थानी फलंदाजीचं ‘पानशेत’ केलं. त्याचबरोबर हिंदुस्थानी संघ फिरकी गोलंदाजी उत्तमपणे खेळू शकतो या श्रद्धेलाच फार मोठा तडा गेला.
सॅण्टनर गोलंदाजीला आला की, हिंदुस्थानी फलंदाज ढूंढो ढूंढो रे साजना या गाण्याचे सूर आळवायला लागायचे. चौथ्या दिवशी लंचला हिंदुस्थानी फलंदाजांनी एक बाद 97 धावा करून जिंकायची उगाचच किंचित आशा दाखवली; पण लंच संपला. सॅण्टनरचे चेंडू फिरायला लागले आणि त्याच्या चेंडूवर हिंदुस्थानी फलंदाजांची बॅट ‘नाचे मन मोरा मगन धीगधा धिगी धीगी’ गुणगुणत नाचायला लागली.
तंबूत परतण्याचा हिंदुस्थानी फलंदाजांचा वेग एका क्षणी तर इतका होता की, असं वाटायला लागलं पॅव्हेलियनमध्ये ‘लाडका क्रिकेटपटू’ या बोर्डाच्या योजनेचे पैसे जय शहा वाटतोय आणि आपला वाटा चुकू नये म्हणून जो तो माघारी धावतोय.
पहिल्या कसोटीत टॉस जिंकून कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी घेतली आणि न्यूझीलंडला जे जीवदान देऊन आपल्या पायावर कुऱहाड मारून घेतली, ते रक्त अजून भळाभळा वाहतेय. त्या चुकीवर न्यूझीलंडने ही मालिका जिंकली. आपण इतिहासातून काही शिकत नाही. पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीला जीवदान दिलं आणि शेवटी स्वतःचाच जीव गमावला.
मी या सामन्यावर नाही लिहिणार. मला खोलात जाऊन हे असं का घडलं याचा आढावा घ्यायचा आहे.
दोन गोष्टी या मालिकेने सिद्ध केल्या. एक म्हणजे, हिंदुस्थानी संघात असा एकही फलंदाज नाही जो पाय रोवून फलंदाजी करू शकतो. त्याला इंग्लंडमध्ये ‘बेड अँड ब्रेकफास्ट बॅटिंग’ असे म्हणतात. म्हणजे खेळपट्टीवर जायचं आणि तंबू ठोकायचा. आणि दुसरी, फिरणाऱया खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी कशी खेळायची याचं तंत्र हिंदुस्थानी फलंदाजांकडे नाही.
आणि ही फक्त हिंदुस्थानी फलंदाजांची स्थिती नाही, तर जगभरातल्या फलंदाजांची ही परिस्थिती आहे.
त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की, क्रिकेटच गेल्या काही वर्षांत पूर्णपणे बदलले आहे.
टी-20 क्रिकेट आल्यापासून कसोटी क्रिकेटवर जे काही दुष्परिणाम झाले त्यातला हा सर्वात महत्त्वाचा दुष्परिणाम. टी-20 क्रिकेटमध्ये जे फिरकी गोलंदाज असतात ते फक्त धावा रोखण्याचा प्रयत्न करतात. मुळात चार षटकांत तो काय युक्ती लढवणार आणि फलंदाजाला काय आमिष दाखवून फसवणार? त्यात खेळपट्टी ही गोलंदाजाची सावत्र आई असते. फक्त फलंदाजाचे लाड करण्यासाठी तयार केलेली. त्यात सीमारेषा छोटी. फलंदाजाच्या बॅटजवळ क्षेत्ररक्षक जवळपास नाहीत. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणे ही गरज. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये जेव्हा चेंडू फिरायला लागतो आणि फिरताना उसळतो. त्यात बॅटच्या जवळचे क्षेत्ररक्षक दबाव टाकत असतात. अशावेळी बचाव कसा करायचा? कुठला चेंडू खेळायचा, कुठला सोडायचा, फुटवर्क कसं असायला हवं, सॉफ्ट हॅण्डने खेळणं म्हणजे काय याची कल्पना त्यांना असूनही त्याचा व्यावहारिक उपयोग होत नाही. कारण त्याची सवयच मोडून गेली आहे. त्यामुळे सॅण्टनरसारखा गोलंदाजसुद्धा खराब खेळपट्टीवर डेरेक अंडरवूड वाटायला लागतो. दुसरी गोष्ट अशी, वनडे आणि टी-20मुळे फलंदाजांमध्ये आक्रमकता इतकी ठासून भरायला लागली आहे की, ते कसोटी क्रिकेटमध्ये चेंडू सोडावेही लागतात हे विसरले आहेत. त्याचबरोबर कसोटीत एकेरी-दुहेरी धावा ही खरी भाकरी असते हेसुद्धा टी-20 आणि वनडेमध्ये चौकारांचे पुलाव खाऊन त्यांच्या विस्मृतीत गेलेली आहे. खेळपट्टीवर ‘नांगर टाकला’ हा वाक्प्रचार जवळपास इतिहासजमा झालाय. तीन-चार षटकांत जर चौकार मिळाला नाही तर फलंदाज कासावीस होतात आणि मोठा फटका खेळायला जातात. त्यावेळी तो चेंडू त्या लायकीचा आहे का याचा विचार करत नाही. खरं तर वनडे आणि टी-20 ने स्वीप आणि रिव्हर्स स्वीप घोटवून घेतलेले आहेत,
पण त्याचा उपयोगसुद्धा हिंदुस्थानी फलंदाजांनी नीट केला नाही. किंबहुना या फटक्यांचा जास्त फायदा न्यूझीलंडच्या फलंदाजानी उठवला. पूर्वी जवळपास प्रत्येक संघाकडे अशा प्रकारचे फलंदाज असत की, जे खेळपट्टीवर दिवस दिवस उभे राहत. त्यांचा एक डोळा घडय़ाळाच्या काटय़ावर असे आणि दुसरा चेंडूवर. इंग्लंडकडे सर लेन हटन, बॅरिंग्टन, बायकॉटसारखे फलंदाज किंवा पाकिस्तानचा हनीफ मोहम्मद. आज सेहवाग त्रिशतक हे 300 पेक्षा कमी चेंडूंत करतो. हनीफ मोहम्मदने 1958 साली वेस्ट इंडीजमध्ये तीन दिवस फलंदाजी करून त्रिशतक ठोकलं होतं, केवळ सामना वाचवण्यासाठी. ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीजकडे असे फारसे फलंदाज नव्हते; कारण त्यांचा कल आज जास्त आक्रमकतेचा होता. पण तरीसुद्धा वेळ आली की फटकेबाज फलंदाजसुद्धा डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करत. मग तो सोबर्स असो किंवा रोहन कन्हाय. आपल्याकडेही विजय मर्चंट, विजय हजारे, विजय मांजरेकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविडसारखे फलंदाज तशा प्रकारची फलंदाजी करायची कुवत बाळगून होते. कारण त्यांच्याकडे संयम होता आणि फिरकी खेळायचं उत्कृष्ट तंत्र. आज शांतपणे दिवसभर फलंदाजी करण्याची कुवत कुठल्या हिंदुस्थानी फलंदाजाकडे आहे? फक्त एकच… विराट कोहली. पण त्याचं फिरकी खेळण्याचं तंत्र अजून भक्कम नाही. भक्कम तंत्र म्हणजे काय याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. विजय मांजरेकर चाळिशीच्या आसपास असतील. मुंबईत पी.जे. हिंदू जिमखान्यावर एक क्लब मॅच खेळत होते. खेळपट्टी भिंगरीसारखी फिरत होती. फॉरवर्ड शॉर्ट लेगला सुपासारखे हात घेऊन एकनाथ सोलकर उभा होता. पण मांजरेकरांचा बचाव इतका भक्कम होता की, त्या खेळपट्टीवर बचाव करताना त्यांचा चेंडू गवताच्या वर उडायचा नाही. सोलकर झेल ‘शोधण्याची’ पराकाष्ठा करत होता. मांजरेकरानी वळून त्याला सांगितलं ‘एक खड्डा करून जरी तू त्यात उभा राहिलास ना, तरी तुझ्या हातात माझा झेल येणार नाही.’ याला म्हणतात आत्मविश्वास. याला म्हणतात तंत्र. ही गोष्ट एकनाथ सोलकरने स्वतः मला सांगितली होती.
जसा प्रत्येक योद्धा हा शिवाजी महाराज, राणा प्रताप किंवा पहिला बाजीराव होत नाही. तसा प्रत्येक फलंदाज हा मांजरेकर, गावसकर, तेंडुलकर किंवा द्रविड होत नाही; पण त्याला मिळालेल्या गुणवत्तेच्या परिघात उभा राहून तो खडूसपणे बचाव करू शकतो. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम पुणे कसोटीतलं किंवा रचिन रवींद्रचं दोन्ही कसोटींतलं उदाहरण महत्त्वाचं आहे. त्यांनी टिच्चून फलंदाजी केली. बचाव करताना चेंडू उगाच जोरात ढकलला नाही. चेंडू येईपर्यंत त्यांनी वाट पाहिली आणि अत्यंत हलक्या हाताने त्यानी तो खेळला. या मूलभूत गोष्टी सर्वसाधारण फलंदाजाला जमायला हव्यात. ते आजच्याच पिढीतले फलंदाज आहेत ना?
टी ट्वेंटीच्या यशाच्या गाढ आणि गोड झोपेतून गदागदा हलवून हिंदुस्थानी संघाला न्यूझीलंडने जागा केला आहे. 50 लाख लोकसंख्या असलेल्या देशातल्या क्रिकेटपटूने 50 लाख लोकसंख्या असलेल्या हिंदुस्थानच्या एका शहरात 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या क्रिकेटची अब्रू लुटली. आता पुन्हा डुलकी नको. सुधारणा करण्यासाठी प्रयत्न असायला हवा. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ढूंढो ढूंढो रे साजना हे माझं आवडतं गाणं आहे. गाणं गुणगुणलं की डोळय़ासमोर तो दिलीप, ती वैजू येते. ती तशीच यावी. यापुढे गाणं गुणगुणताना हिंदुस्थानी फलंदाजी डोळय़ासमोर येऊ नये.