गट्स ऍण्ड ग्लोरी – द्वारकानाथ संझगिरी

आपण ना क्रिकेटपटूंच्या बाबतीत नेहमीच असं बोलून जातो की त्यांनी देशाला घाम दिला, त्यांनी रक्त दिलं वगैरे. किंवा एखाद्या खेळीचं वर्णन Guedts and Gloryed असं करतो. प्रत्येकासाठी हे योग्य असतंच असं नाही. पण हे एका माणसासाठी ते कायम योग्य होतं. त्या माणसाचं नाव अंशुमन दत्ताजीराव गायकवाड. घाम तर त्याने गाळलाच. पण त्याने रक्तसुद्धा मैदानावर सांडलं. वेस्ट इंडियन गोलंदाजांनी त्याला काही वेळा अक्षरशः शेकवून काढलं. उंच होता त्यामुळे त्याला बाऊन्सर खेळताना वाकणं सोपं नव्हतं. तो चेंडूच्या रेषेतून बाजूला व्हायचा. कधी कधी बाजूला होताना चेंडू त्याच्या छातीलासुद्धा लागायचा. आणि ज्यावेळेला शरीरवेधी गोलंदाजी टाकली जायची त्या वेळेला त्याची छाती आणि बरगड्यांखालचा भाग हा काळानिळा होऊन जायचा. पण तरीसुद्धा झाशीची राणी जशी लढली ना, ‘मेरी झाशी नही दूँगी’ म्हणत तसा तो ‘मेरी विकेट नही दूंगा’ या थाटातच लढायचा.

तो त्याच्या कारकीर्दीत 40 कसोटी सामने खेळला. त्यातले 22 तो वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला. म्हणजे वेस्ट इंडीज आली की अंशुमन गायकवाडला घेतलंच जायचं. आणि ज्या काळातल्या वेस्ट इंडीज संघातले एकामागोमाग एक वेगवान गोलंदाज तुम्हाला बाऊन्सर टाकताहेत. बिमर टाकताहेत. आणि ज्या काळामध्ये तुमच्याकडे फक्त ग्लोव्हज, पॅड असायचे, हेल्मेटसुद्धा आलेलं नव्हतं. चेस्ट पॅडसुद्धा नव्हतं आणि कुठल्याही प्रकारे गोलंदाजीवर बंधनं नव्हती. किती बाऊन्सर टाकावेत, किती बिमर्स टाकावेत यावर निर्बंध नव्हते. त्या काळात अंशुमन खेळत होता.

त्याचा एकच किस्सा सांगतो. वेस्ट इंडीजचा. तिथे जमैका कसोटीत अंशुमनच्याच भाषेत सांगायचं, तर स्लिपमधून लॉइड ओरडायचा, ‘थुद.’ आणि मग जे बाऊन्सर्स यायचे, राऊंड द विकेट टाकताना कधी खांद्याला, कधी डोक्याकडून, कधी बिमर असे प्रत्येक प्रकारचे चेंडू आले आणि तरीदेखील अंशुमन टिच्चून उभा राहिला.

शेवटी मायकल होल्डिंगचा एक चेंडू इतक्या वेगात राऊंड द विकेट आला की, तो अंशुमनला दिसलाच नाही आणि तो त्याच्या कानाला लागला. कानातून रक्त यायला लागलं. भरपूर रक्त वाहायला लागलं. त्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये घेऊन जाण्यासाठी काही खेळाडू आले. गंमत पहा की एवढं सगळं होऊन त्याला आत नेल्यानंतरसुद्धा ताबडतोब डॉक्टरकडे कुणी घेऊन गेलं नाही. तिथे एक स्थानिक डॉक्टर होता. त्या स्थानिक डॉक्टरला बोलवलं आणि त्या डॉक्टरने त्याला सांगितलं की, ‘त्याला काही जास्त लागलेलं नाहीय. कानाशी काहीतरी प्रॉब्लेम झालाय.’ तिथे एक हिंदुस्थानी डॉक्टर होता. तो म्हणाला, ‘नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये हलवायला पाहिजे आणि ‘आयसीयू’मध्ये ठेवायला पाहिजे.’ यातच वीस-पंचवीस मिनिटं गेली. पॉली उम्रीगर त्यावेळेला मॅनेजर होते आणि पॉली उम्रीगर यांनी नरी कॉन्ट्रक्टरच्या डोक्याला लागलेला चेंडू पाहिला होता. त्यानंतर काय काय घडलं ते पाहिलं होतं. नरी कॉन्ट्रक्टरला कशी ट्रीटमेंट मिळाली हे पाहिलं. आणि तो कसा वाचला होता हे पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी घाई केली आणि अंशुमनला हॉस्पिटलात न्यायला सांगितलं.

ऍम्ब्युलन्ससुद्धा नव्हती. एका तगड्या माणसाने तगड्या अंशुमन गायकवाडला खांद्यावर घातलं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि तिथे तीन दिवस तो आयसीयूमध्ये होता. त्याला चौथ्या दिवशी सोडत नव्हते. पण त्याने ठरवलं काय व्हायचं ते होवो आता आपण हिंदुस्थानात परत जाऊनच ट्रीटमेंट घ्यायची. मग तो मायदेशात आला. नशिबाने प्रवासात काही झालं नाही आणि हिंदुस्थानात त्याच्या कानावर दोन-तीन शस्त्रक्रिया झाल्या आणि त्या लागलेल्या चेंडूचा दीर्घ परिणाम त्याच्या कानाला जाणवला. विशेषतः ऐकू येण्याच्या बाबतीत.

आणि काय सांगायची गरज आहे?

मी आजारी पडल्यावर सचिन तेंडुलकरने एक कार्यक्रम आयोजित केला होता. पण बरेच खेळाडू आले होते. अंशुमनसुद्धा आला होता. स्टेजवरून त्यांनी जोरात आणि ओरडून सांगितलं ‘पप्पू, मी आलोय आणि फक्त तुझ्यासाठी आलोय.’ तो परत गेला आणि त्यांना कळलं की त्याला कॅन्सर झालाय आणि असा की जो बरा होणं फार कठीण असतं. त्यानंतर माझं त्याच्याशी कधीच बोलणं झालं नाही. त्यामुळे आजही तेच शब्द माझ्या कानात सतत गुंजत असतात ‘पप्पू, मी तुझ्यासाठी आलो आहे, फक्त तुझ्यासाठी.’