
शुगरकॉन-2024 आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या आयोजन समितीने श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सादर केलेला “सब-सरफेस ड्रेनेज (एसएसडी) प्रकल्पाचा “क्षारयुक्त माती सुधारणे आणि त्याचा साखरेच्या उत्पादनावर आणि उत्पादकतेवर परिणाम” या शीर्षकाचा शोध प्रबंध स्वीकारला आहे. दि. 16 ते 19 दरम्यान आय. सी. आय. एस. एफ., क्यू न्होन, रिन्ह दिन्ह व्हिएतनाम येथे आयोजित 8 व्या आय. ए. पी. एस. आय. टी. आंतरराष्ट्रीय साखर परिषद आणि शुगरकॉन परिषदेत याचे सादरीकरण होणार आहे. ही माहिती उद्यानपंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“लवचिक आणि शाश्वत जागतिक साखर उद्योग आणि जैव-ऊर्जा उद्योग: साखर क्षेत्राचे रूपांतर” या विषयावरील आगामी आंतरराष्ट्रीय परिषदेला 20 साखर उत्पादक देशांतील 250 प्रतिनिधी असतील. प्रख्यात साखर पीक तज्ज्ञ, संशोधक, साखर आणि अल्कोहोल तंत्रज्ञ यांच्यासह उद्योग व्यवस्थापक, धोरणकर्ते आणि प्रगतीशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेत संचालक इंद्रजित पाटील, महेंद्र बागे, बाळासाहेब पाटील हलसवडे, ऍड. प्रमोद पाटील, श्री दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, माती परीक्षण विभाग प्रमुख ए. एस. पाटील, अंबादास नानिवडेकर आदी उपस्थित होते.