विधान भवनात धुळीचे साम्राज्य

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधानभवनात धुळीचे साम्राज्य पसरल्याचे सर्वांना दिसून आले. अधिवेशनापूर्वी विधान भवनातील तळमजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंत दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली गेली. त्यावर लाखो रुपये खर्च केला गेला; परंतु त्यानंतर करायची साफसफाई योग्य रीत्या झालेली नाही.

अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार याची पूर्वकल्पना असूनही हा हलगर्जीपणा कसा झाला अशी चर्चा विधान भवनात सुरू होती. पहिल्या आणि चौथ्या मजल्यावर अनेक गाळय़ांमध्ये अजूनही धूळ, माती, रंगरंगोटीचे डबे असा कचरा तसाच पडून आहे. अनेक कार्यालयांमधील संगणकांवर धूळ साचल्याचे दिसून आले. जिन्यासमोरील लिफ्टच्या बाजूला असलेल्या कोपऱयात साठवून ठेवलेला कचरा तसाच पडून आहे. जिन्यांवरही धूळ असून ती साफ केली गेलेली नाही. त्यामुळे आज प्रवेश करताच कर्मचारी, पत्रकार, लोकप्रतिनिधींना तोंडावर रुमाल लावूनच दालनात प्रवेश करावा लागला. विधान भवनाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु ते बैठकीसाठी दुसरीकडे गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. दुरुस्ती व रंगरंगोटीची जबाबदारी असणाऱया अधिकाऱयांनीही साफसफाईच्या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न करत एक-दोन दिवसांत स्वच्छता होईल असे उत्तर दिले.