पश्चिमरंग – बबारची गोष्ट

>> दुष्यंत पाटील

युरोपमधील पहिल्या महायुद्धााच्या वेळी विख्यात फ्रेंच संगीतकार पूलांक याने रचलेले हे संगीत. पियानोवर उत्स्फूर्तपणे संगीत वाजवायला सुरुवात केली. बबार या लहान हत्तीची गोष्ट वाचत त्याने पियानोवर उत्स्फूर्तपणे रचलेले हे संगीत. बबारच्या कथेतले प्रसंग पूलांकनं संगीतातून अक्षरशः जिवंत केले. पूलांकच्या या संगीत रचनांना पाश्चात्य अभिजात संगीतात एक खास स्थान आहे.

1939 मध्ये युरोपमध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं. 1940 च्या मे महिन्यात फ्रान्सची भूमी जर्मन लोकांनी ताब्यात घेतली. फ्रेंच लोकांसाठी हा कठीण काळ होता. विख्यात फ्रेंच संगीतकार पूलांक या काळात पॅरिस सोडून ग्रामीण भागात राहायला गेला.तिथे एकदा एका मित्राच्या घरी गेला. तिथे पियानो पाहिल्यावर त्यानं त्यावर संगीत वाजवायला सुरुवात केली. त्या घरात एक चार वर्षांची मुलगी होती. ती मात्र या संगीतानं वैतागली. “किती घाणेरडं संगीत आहे हे.’’ असं म्हणून तिने बालसुलभ आत्मविश्वासाने पूलांकचे हात पियानोवरून काढून घेतले. तिने पूलांकला तिचं गोष्टीचं पुस्तक दिलं आणि त्यावर संगीत वाजवायला सांगितलं.

चार वर्षांच्या मुलाला आवडेल असंच ते पुस्तक होतं. त्या पुस्तकात एका लहान हत्तीची गोष्ट होती. या लहान हत्तीचं नाव बबार असं होतं. ते चित्रमय पुस्तक पाहून कल्पक बुद्धी असणाऱया पूलांकला मजा वाटली. त्याने पुस्तकातल्या प्रत्येक पानावरच्या ओळी वाचल्यावर त्यांना अनुसरून पियानोवर उत्स्फूर्तपणे संगीत वाजवायला सुरुवात केली. बबारच्या कथेतले प्रसंग पूलांकने संगीतातून अक्षरशः जिवंत केले.

त्या मुलीला हे संगीत आवडलं. लवकरच ही गोष्ट आजूबाजूच्या लहान मुलांमध्ये पसरली. आजूबाजूची मुलंही त्या मुलीच्या घरी पूलांक आल्यानंतर यायला लागली. मग पूलांक या सगळ्या मुलांसमोर बबारची कथा वाचून आणि पियानोवर वाजवून दाखवायला लागला. पूलांकने संगीत दिलेली बबारची गोष्ट लहान मुलांमध्ये लोकप्रिय होती. या गोष्टीत बबारचा जन्म एका जंगलात होतो. मग कुणीतरी शिकारी माणूस त्याच्या आईची शिकार करतो. बबारला आपला जीव वाचवण्यासाठी जंगल सोडून शहरात जावं लागतं. तिथे एक दयाळू स्त्राr बबारला आसरा देते आणि माणसांसारखं वागायला शिकवते. मग बबार कपडे घालणं, कार चालवणं यांसारख्या गोष्टी शिकतो. शहरात कितीही मजा येत असली तरी त्याला जंगलाची आठवण येत असते. नंतर एके दिवशी बबारची भावंडं शहरात येतात. जंगलच्या राजाचा मृत्यू झाल्याचं त्याला कळतं. मग बबार जंगलात परततो. तिथे बबारची नवीन राजा म्हणून निवड होते. मग बबारचं लग्नही होतं.

या कथेतल्या प्रत्येक प्रसंगाला साजेसं संगीत पूलांकने रचलं होतं. बबारच्या सुरुवातीच्या आयुष्यातल्या जंगलामधल्या दिवसांसाठी आनंदी संगीत येत होतं, तर त्याच्या आईच्या मृत्यूनंतर दुःखी संगीत येत होतं. बबारने शहरात प्रवेश केल्यानंतर शहरातल्या नवनवीन गोष्टींविषयीचं त्याचं कुतूहल दाखवणारं संगीत येत होतं. बबारची भावंडं शहरात आल्यानंतर त्यांच्या झालेल्या भेटीच्या संगीतात उत्साह दिसत होता.

महायुद्ध संपल्यानंतर पूलांकने ‘बबार’च्या संगीताकडे पुन्हा एकदा लक्ष दिलं. त्याने या संगीतावर शेवटचा हात फिरवला. 1946 मध्ये त्याने हे संगीत प्रकाशित केलं. युद्धाच्या काळात ज्या लहान मुलांसमोर तो हे संगीत वाजवायचा, त्यांनाच हे संगीत त्याने समर्पित केलं. हे संगीत लोकांना चांगलंच आवडलं. या संगीताचा कार्यक्रम बीबीसीवरही सादर झाला. पूलांकच्या या संगीत रचनांचं पाश्चात्य अभिजात संगीतात एक खास स्थान आहे. जरी हे संगीत लहान मुलांसाठी रचलं गेलं असलं तरी सर्वच वयाच्या लोकांमध्ये ते आवडीने ऐकलं जातं. या संगीताचे आजपर्यंत कित्येक कार्यक्रम झाले आहेत. बबारची कथा पूलांकने आपल्या संगीतामधून नेमकी कशी जिवंत केली आहे ते पाहण्यासाठी आपण youtube वर जाऊन Poulenc ची L’histoire de Babar ही रचना नक्की ऐकू या!

[email protected]