पश्चिमरंग – माड्रगल्स

>> दुष्यंत पाटील

रेनेसॉन्स काळात उच्चभ्रू वर्गात होणाऱया मेजवान्यांमध्ये ‘माड्रगल्स’चं संगीत हे प्रमुख आकर्षण असायचं. ‘माड्रगल्स’ची खासियत म्हणजे त्यातली पॉलिफोनी. ‘माड्रगल्स’ची सुरुवात इटलीमध्ये झाली असली तरी कालांतराने ते सगळ्या युरोपभर पसरले. विशेषत इंग्लंडमध्ये ते जास्त लोकप्रिय झाले. मात्र आता ही लोकप्रियता घटली असल्याने युरोपात या समृद्ध संगीत परंपरेचे जतन केले जात आहे.

कल्पना करा की, रेनेसॉन्स काळातल्या इटलीमध्ये एका शहरात एका धनाढ्य व्यक्तीने मोठय़ा मेजवानीचं आयोजन केलंय. संध्याकाळची वेळ आहे आणि सगळी आमंत्रित मंडळी मेजवानीसाठी येत आहेत. मेजवानीचं प्रमुख आकर्षण आहे ‘माड्रगल्स’ संगीताचा कार्यक्रम! मेजवानीत गायनासाठी पट्टीच्या गायकांना बोलावण्यात आलंय. सारे आमंत्रित मेजवानीच्या मोठ्या हॉलमध्ये पोहोचले आहेत. हॉलच्या भिंतींवर मोठमोठय़ा कलाकारांची तैलचित्रं आहेत. हॉलमध्ये मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात संगीताचा कार्यक्रम सुरू होतोय.

नक्षीदार वेल्व्हेटचे कपडे परिधान केलेली गवई मंडळी सुप्रसिद्ध संगीतकारांनी संगीत दिलेल्या काही ‘माड्रगल्स’ संगीत रचना सादर करणार आहेत. त्यातल्या काही रचना प्रेमाच्या, विरहाच्या आहेत, तर काही निसर्गावरच्या. त्यांना साथ द्यायला काही वादक मंडळीही आहेत.

सिप्रियानो दि रोर या सुप्रसिद्ध संगीतकाराने रचलेलं ‘माड्रगल्स’ सुरुवातीलाच सादर होत आहे. सहा गायक अर्धवर्तुळाच्या आकारात उभे आहेत. त्यातला एक गायक वरच्या पट्टीत गायला सुरुवात करतोय. मग हळूहळू एक-एक गायक गायनात प्रवेश करत आहे, पण प्रत्येक जण वेगवेगळ्या स्वरांमध्ये संगीतातल्या वेगवेगळ्या ओळी गात आहे. कुठल्याही क्षणी इतक्या आवाजांनी गोंधळ उडत नाही आणि कर्कशताही येत नाही. संगीत रचनेत सारे आवाज अतिशय कौशल्याने गुंफलेले आहेत. पण ‘माड्रगल्स’ हा नेमका काय प्रकार होता?

1520 च्या दशकात इटलीमध्ये ‘माड्रगल्स’ची सुरुवात झाली. सुरुवातीची ‘माड्रगल्स’ आधीच्या संगीत प्रकारांवरून प्रेरित होती. पण लवकरच ‘माड्रगल्स’ हा एक स्वतंत्र संगीत प्रकार म्हणून विकसित झाला. ‘माड्रगल्स’ची खासियत म्हणजे त्यातली पॉलिफोनी. पॉलिफोनीमध्ये अनेक स्वतंत्र आवाज वेगवेगळ्या स्वरांमध्ये गात असले तरी त्यांच्या एकत्रित गायनात माधुर्य असतं. एक प्रकारे संगीताच्या ओळी या रचनांमध्ये एकमेकांत गुंफलेल्या असतात. पुढे या रचनांमध्ये ‘वर्ड पेंटिंग’ नावाचं तंत्र आलं. वर्ड पेंटिंग म्हणजे शब्दांचं चित्र. हे तंत्र वापरत गाण्यातली एखादी ओळ गाताना त्या ओळीचा अर्थ गायनाच्या शैलीतून आणण्याचा प्रयत्न ‘माड्रगल्स’ गायक करायचे. उदा. गाण्याच्या ओळीत पक्षी वर उडत जाऊन दिसेनासे होत असल्याचं वर्णन असेल तर गायक मंडळी गाताना एक-एक स्वर वर जाऊन स्वतचा आवाज हळुवार करत. त्यामुळे श्रोत्यांना पक्षी वर उडत गेल्यासारखं वाटायचं.

‘माड्रगल्स’ची सुरुवात इटलीमध्ये झाली असली तरी कालांतरानं ते सगळ्या युरोपभर पसरले. विशेषत इंग्लंडमध्ये ते जास्त लोकप्रिय झाले. सोळाव्या आणि सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये ‘माड्रगल्स’ लोकप्रियतेच्या शिखरावर होते. इटालियन ‘माड्रगल्स’मधली पॉलिफोनी आणि वर्ड पेंटिंग्ज इंग्लंडमधल्या ‘माड्रगल्स’मध्ये होतीच. शिवाय, इंग्लंडमधल्या लोकसंगीताच्या प्रभावामुळे ‘माड्रगल्स’मध्ये डान्सला साजेसा ताल यायला लागला.

सतराव्या शतकाच्या मध्यात मात्र ‘माड्रगल्स’च्या लोकप्रियतेला उतरती कळा लागली. ऑपेरा आणि गायनातला ‘कॅनाटा’ हे प्रकार लोकप्रिय होत गेल्याने ‘माड्रगल्स’ मागे पडलं. ‘माड्रगल्स’ची लोकप्रियता घटण्याचं अजून एक कारण म्हणजे इटलीमध्ये वाढत गेलेली ‘मोनोडी’ संगीत प्रकारची लोकप्रियता. ‘मोनोडी’मध्ये एकच गायक गायन करतो, तर त्याला इतर वादक मंडळी वाद्यांवर साथ देतात.

आपल्या समृद्ध संगीत परंपरेचं जतन करण्यासाठी युरोपमधले लोक ‘माड्रगल्स’च्या स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धा स्थानिक, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवर होताना दिसतात. त्यामुळे समूह गायनाला प्रोत्साहन मिळतं. आजही अशा स्पर्धांमध्ये गायक मोठय़ा उत्साहाने भाग घेताना दिसतात. ‘माड्रगल्स’चं पाचशे वर्षांपूर्वीचं संगीत युरोपीय लोकांना आजही का जतन करावंसं वाटतं हे बघण्यासाठी आपण यूटय़ूबवर जाऊन ‘माड्रगल्स’चं संगीत नक्कीच ऐकायला हवं !

[email protected]