पश्चिमरंग- दि टेल्स ऑफ हॉफमन

>> दुष्यंत पाटील

दि टेल्स ऑफ हॉफमन’ या ऑपेराची निर्मिती होत असताना त्या ऑपेरासाठी संगीत रचण्याचं काम हेक्टर सालोमन नावाच्या संगीतकाराला देण्यात आलं होतं. त्याचं संगीत रचण्याचं काम जवळपास पूर्णही झालं होतं. मात्र ऑफनबाक सालोमनला जाऊन भेटला आणि त्यानं या ऑपेराला संगीत देण्याची इच्छा व्यक्त केली. एका सच्च्या संगीतकाराची तळमळ सालोमनला स्पष्टच दिसल्याने त्याने उदारपणे या ऑपेरामधून माघार घेतली आणि हे संगीत देण्याचं काम ऑफनबाकला मिळालं!

एकोणिसाव्या शतकात फ्रान्समध्ये जॅकस ऑफनबाक नावाचा एक संगीतकार होऊन गेला. 1819 मध्ये जन्मलेल्या ऑफनबाकनं कित्येक ऑपरेटांसाठी संगीत दिलं. ऑपरेटा म्हणजे ऑपेराची छोटी व्हर्जन. बहुतेक वेळा हे विनोदी असतात. त्याचं कथानक बऱयाचदा उपहासात्मक असतं. ऑपरेटाचा कालावधीही ऑपेरापेक्षा कमी असतो. ऑपरेटामध्ये ऑपेरासारखं गांभीर्य, गहनता नसते. ऑफनबाकनं 1850 ते 1870 च्या दशकापर्यंत आपल्या संगीतानं कित्येक ऑपरेटा गाजवले.

ऑपरेटांना इतकं संगीत देणाऱया ऑफनबाकची एक इच्छा अपुरी राहिली होती. एखादं गंभीर कथानक असणाऱया भव्य ऑपेरासाठी त्याला संगीत द्यायचं त्याचं जुनं स्वप्न होतं, पण तो योगच जुळून आलेला नव्हता. 1870 च्या दशकात ऑफनबाक अमेरिकेचा प्रवास करून पॅरिसला परत आला. वय साठीकडे झुकत असताना त्याच्या डोक्यात आता नकारात्मक विचार यायला सुरुवात झाली. आपलं आयुष्य संपत आल्यासारखं त्याला वाटत होतं. त्याची अपुरी इच्छा त्याला आता जास्त सतावत होती. फक्त ‘ऑपरेटांना संगीत देणारा प्रसिद्ध संगीतकार’ अशी असणारी त्याची ओळख आता त्याला नकोशी झाली होती.

वयाच्या तिशीत असताना ऑफनबाकनं एक नाटक पाहिलं होतं. बार्बिअर आणि कॅरे यांनी लिहिलेल्या या नाटकाचं नाव होतं ‘दि टेल्स ऑफ हॉफमन’. या कथानकात गांभीर्य होतं, शोकांतिका होती, कल्पनारम्यता होती. या कथानकावर एखादा चांगला ऑपेरा बनवता आला असता असा विचार ऑफनबाकच्या डोक्यात आला होता. त्या वेळी त्यानं हा विचार बार्बिअरला बोलूनही दाखवला होता, पण काळाच्या ओघात ही गोष्ट तो विसरूनही गेला होता.

1876 मध्ये ‘दि टेल्स ऑफ हॉफमन’ या ऑपेराची निर्मिती होत असल्याचं ऑफनबाकच्या कानावर पडलं. हा ऑपेरा बार्बिअरनंच लिहिला होता, पण या ऑपेरासाठी संगीत रचण्याचं काम हेक्टर सालोमन नावाच्या संगीतकाराला देण्यात आलं होतं. खरं तर त्याचं संगीत रचण्याचं काम जवळपास पूर्णही झालं होतं. ऑफनबाकसाठी खूपच उशीर झाला होता, पण ऑफनबाकचं अंतर्मन सांगत होतं की, हा ऑपेरा त्याचाच होता. त्याची जन्मभराची अपुरी इच्छा या ऑपेराला संगीत देऊनच पूर्ण होणार होती. तो सालोमनला जाऊन भेटला आणि त्यानं या ऑपेराला संगीत देण्याची इच्छा व्यक्त केली. सालोमनला लगेच लक्षात आलं की, ही ऑफनबाकची क्षणिक लहर नव्हती. एका सच्च्या संगीतकाराची तळमळ सालोमनला स्पष्टच दिसली. त्यानं उदारपणे या ऑपेरामधून माघार घेतली आणि हे संगीत देण्याचं काम ऑफनबाकला मिळालं! ऑफनबाकची अपुरी इच्छा आता पूर्ण होणार होती.

या ऑपेराच्या कथानकात हॉफमन नावाचा नायक असतो. ऑपेराच्या तीन अंकांमध्ये एकूण तीन कथा येतात. प्रत्येक कथेत तो स्त्राrच्या प्रेमात पडतो आणि त्याच्या पदरी निराशा येते. जसं हॉफमनला या कथानकात आपलं खरं प्रेम मिळत नव्हतं, तसंच ऑफनबाकला आपलं खरं प्रेम (ऑपेरा) जन्मभर मिळालेलं नव्हतं. त्यामुळे हॉफमनच्या कथा त्याला जवळच्या वाटत होत्या. ऑफनबाकनं या ऑपेरासाठी उत्कृष्ट संगीत रचलं.

ऑपेराच्या तिसऱया अंकातल्या कथेत हॉफमन एका धूर्त, कपटी वेश्येच्या प्रेमात पडतो. अर्थातच हॉफमनला तिच्या वास्तवाची कल्पना नसते. त्याचं प्रतिबिंब चोरण्यासाठी ती त्याच्याशी प्रेमाचं नाटक करत असते. (त्याचं प्रतिबिंब म्हणजे त्याच्या स्वत्वाचं प्रतीक असतं. तेच चोरल्यानंतर त्याची स्वतची अशी ओळखच राहणार नसते.) या तिसऱया अंकाची सुरुवात होताना “Beautiful night, o night of love” असं एक गीत येत होतं. ही कथा इटलीमधल्या व्हेनिस इथे घडत होती. व्हेनिसमधल्या नावाडय़ांच्या गीतांच्या शैलीमध्ये (बाकारोल) हे गीत रचलं गेलं होतं. हे गीत अजरामर होणार होतं. ‘दि टेल्स ऑफ हॉफमन’ हा ऑपेरा प्रदर्शित होईल तेव्हा तो पाहण्यासाठी आपण जिवंत नसू अशी भीती ऑफनबाकला होती. ती खरी ठरली. ऑफनबाकचा 1880च्या ऑक्टोबरमध्ये मृत्यू झाल्यावर चार महिन्यांनी हा ऑपेरा प्रदर्शित झाला.

ऑपेरामधलं बाकारोलचं संगीत प्रचंड लोकप्रिय झालं. हे संगीत कित्येक चित्रपटांमध्ये वापरलं गेलं. विशेषत ‘लाईफ इज ब्युटिफुल’ चित्रपटात या संगीताचा अतिशय परिणामकारक वापर करण्यात आला. हे संगीत आपण यूटय़ूबवर “Offenbach Barcarolle” असा सर्च करून ऐकू या.

[email protected]