श्री वारकरी प्रबोधन महासमिती (महाराष्ट्र) यांच्या वतीने श्री पांडुरंग रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त हजारो वारकऱयांनी आज भव्य पालखी सोहळय़ात भाग घेत विठूनामाचा गजर केला. पालखी सोहळा श्रीराम मंदिर-कॉटन ग्रीन ते वडाळा श्री विठ्ठल मंदिर ते फाईव्ह गार्डन असा मोठय़ा उत्साह आणि जल्लोषात पार पडला. यावेळी पालखीबरोबरच दिंडी आणि रिंगण सोहळय़ामुळे मुंबईकरांना पंढरपूरला न जाताच भक्तीचा सोहळा पाहायला मिळाला. दरम्यान, यावेळी दैनिक ’सामना’च्या वतीने समाज प्रबोधन पुरस्कारासह विविध पुरस्कार मान्यवरांना देण्यात आले. सोहळय़ावेळी समिती विश्वस्त हभप बाबासाहेब मिसाळ, हभप अशोक महाराज सूर्यवंशी, हभप मनोज पुंडे, वाशी येथील उद्योजक संजय आवारे, राजन शितोळे, विलास घुले, श्यामराव शिंदे, भजन गायक ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते. आपल्या खास शैलीतील निवेदनाने विजय कदम यांनी सोहळय़ात रंगत आणली.
दिंडय़ांचे जागोजागी स्वागत
काळाचौकी येथे शिवसेना शाखा आणि माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्या वतीने तर लालबाग येथे सुधीर साळवी, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ सहकार भवन येथे अनिल पाटील मित्र मंडळ त्यासोबतच अनेक मंडळांनी जागोजागी खाद्यपदार्थ व फळ वाटप करून दिंडीत सहभागी वारकऱ्यांचे स्वागत केले. वडाळय़ामधील विठ्ठल मंदिर येथे दिंडय़ांच्या स्वागताकरिता खासदार अनिल देसाई आवर्जून उपस्थित होते.
महिलांचा मोठा सहभाग
आषाढी वारीप्रमाणे मुंबईकरांना पायी दिडी व पालखी सोहळय़ाचा आनंदाचा अनुभव घेता यावा या उद्देशाने 2001 पासून या सोहळय़ाची मुंबईत सुरुवात करण्यात आली. या सोहळय़ाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने दरवर्षीपेक्षा जास्त दिंडय़ा सहभागी झाल्या होत्या. दिंडय़ांमध्ये विशेष करून महिला तसेच तरुण वर्गाचा सहभाग उल्लेखनीय होता.
‘वारकरी रत्न’ पुरस्कार बीडचे हभप बन्सी महाराज उबाळे यांना तर संत श्री हैबतीबाबा वारकरी सेवा पुरस्कार आळंदी येथील हभप माणिक महाराज मुखेकर शास्त्री यांना श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने प्रदान करण्यात आला. काही सेवा पुरस्कार व मुंबईतील दिंडय़ांना वारकरी दिंडी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यंदा सांगली व कोल्हापूर येथूनसुद्धा दिंडय़ा सहभागी झाल्या होत्या. डॉ. जितेंद्र सूर्यवंशी आणि श्री विश्व माऊली वारकरी सेवा संस्था प्रामुख्याने फार्मास्युटिकल क्षेत्रात असणाऱ्या गायकांकडून वडाळा श्री विठ्ठल मंदिर येथे सुस्वर अभंग वाणीची दिवसभर सेवा देण्यात आली.
जळगाव मुक्ताई संस्थानचे हभप रवींद्र महाराज हरणे यांना श्री वारकरी समितीचे अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्त्री आणि शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते दैनिक ‘सामना’चा समाज प्रबोधन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड (मार्केट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे, माजी नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते.