Ganeshotsav 2024 – बाप्पा पावला! गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 300 गाड्या धावणार

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येत आहेत. चाकरमान्यांच्या सेवेसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि दक्षिण रेल्वे यांच्या समन्वयाने रेल्वेगाड्यांच्या 310 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने काही उपाय योजनाही हाती घेतल्या आहेत.

गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्या उधना, विश्वामित्री, सुरत, अहमदाबाद, मुंबई सेंट्रल, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे, पनवेल ते रत्नागिरी, कुडाळ-सावंतवाडी रोड, मडगाव, सुरतकल, ठोकूर आणि मंगळूर या मार्गावरुन धावणार आहेत. राज्य आरोग्य प्राधिकरणाच्या समन्वयाने माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वेस्थानकावर प्रथमोपचार चौकी उभारण्यात आली आहे. 16 सप्टेंबरपर्यंत प्रथमोपचार चौकी 24 तास सुरु राहणार आहेत. वैद्यकिय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत चिपळूण आणि रत्नागिरी आरोग्य पथकामध्ये उपलब्ध राहणार आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी यात्री सहाय्यक

प्रवाशांच्या सोयीसाठी यूटीएस तिकीटांच्या बुकींग सुविधा 7 पीएसआर स्थानकांवर म्हणजेच माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे उपलब्ध राहणार आहेत. 18 सप्टेंबरपर्यंत माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी स्थानकावर अतिरिक्त युपीएस तिकीट आरक्षण खिडकी उघडली जाणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर यात्री सहाय्यक तैनात ठेवण्यात आले आहेत. प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी रेल्वेस्थानकाबाहेर एसटी बस सेवा सुरु राहणार आहे. मोबाईलद्वारे तिकीट बुक करण्यासाठी क्युआर कोड सुविधा उपलब्ध राहणार आहे.

सुरक्षा आणि व्यवस्था राखण्यासाठी तसेच अनधिकृत प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर तिकीटांची तपासणी होणार आहे. सर्वच स्थानकांवर सीसीटिव्ही सुरु राहणार आहेत. त्याचे मडगाव रेल्वेस्थानकावरील मुख्य नियंत्रण कक्षात निरिक्षण केले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस बल तैनात राहणार आहे.