कचऱ्याचे डोंगर उभे राहिलेल्या दत्तनगर परिसरातील उतेखोलजवळील डम्पिंगवर वारंवार आगीचा भडका उडत असून 50 हजार माणगावकरांना ‘धूर’ कोंडीचा सामना करावा लागत आहे. धुराच्या प्रचंड लोटाने परिसरातील नागरिकांना श्वसन आणि डोळ्यांचे आजार बळावू लागले आहेत. याबाबत अनेकदा दक्ष नागरिकांनी तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
माणगावच्या दत्तनगर परिसरातील उतेखोल येथील डम्पिंग ग्राऊंडला महिनाभरापूर्वी आग लागल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास पुन्हा भीषण आग लागून अग्निकल्लोळ उसळला. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापला होता. तब्बल दोन किलोमीटरपर्यंत धुराचे काळे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र डम्पिंग ग्राऊंडमधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचा रात्रभर जीव गुदमरला. या कचऱ्याला वारंवार आगी लागत असल्याने या परिसरातील तब्बल ५० हजार नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या डम्पिंग ग्राऊंडमधून कचरा जाळल्याने निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे आजार बळावले आहेत. तसेच कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांमुळे अनेकवेळा अपघातदेखील झाले आहेत. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
कचरा कोण जाळतोय की जाळला जातोय?
शासनाकडून 56 लाखांचा प्लास्टिक कचरा क्रशिंग करणाऱ्या दोन मशीन नगरपंचायतीला देण्यात आल्या आहेत. मात्र प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया न करताच या दोन्ही मशीन गेल्या वर्षभरापासून धूळखात पडल्या आहेत. या मशीनचा वापर करायचाच नव्हता तर त्या आणल्या कशाला, असा सवाल करतानाच रायगड जिल्हातील युवासेनेचे चिटणीस परेश उभारे यांनी डम्पिंगची आग विझवून झाल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असे त्यांनी सांगितले. डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा कोण जाळतोय की जाळला जातोय, असाही सवाल त्यांनी केला.